मुसळधार पावसाने बारामतीला झोडपले   

बारामती, (वार्ताहर) : एका रात्रीत तब्बल १५८ मिमी पावसामुळे शहरातील सखल भाग जलमय झाला असून, प्रमुख रस्त्यांवर पाणी साठले. यामुळे  वाहतुकीचे मोठे आव्हान निर्माण झाले. मात्र, या नैसर्गिक संकटापुढे बारामतीची यंत्रणा डगमगली नाही. पावसाचा जोर ओसरताच अवघ्या दोन तासांत प्रमुख रस्त्यांवरील पाण्याचा निचरा करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. 
 
विशेष म्हणजे, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक आणि नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी केवळ आदेश देत बसले नाहीत, तर स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी झटत होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे यांचे मार्गदर्शन, खासदार पार्थ पवार व युवा नेते जय पवार यांच्या सूचना आणि स्थानिक प्रशासनात समन्वयातून अवघ्या दोन तासांत परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण कामगिरी करण्यात आली. संकट कितीही मोठे असो, अजित पवारांनी घडवलेली बारामतीची कामाची गती आणि शिस्त थांबणार नाही, याचा प्रत्यय या निमित्ताने आला.
 
सोमवारी पहाटेपासून बारामती शहरात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. सकाळी सात वाजेपर्यंत शहरात तब्बल १५८ मिमी पावसाची नोंद झाली. अवघ्या काही तासांत महिनाभराचा पाऊस पडावा, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शहरातील अनेक सखल भागांत गुडघाभर पाणी साचले. 
 
मुख्य भिगवण रस्त्यासह अन्य प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला होता. सकाळच्या वेळेत नागरिकांची होणारी गैरसोय आणि संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नगरपरिषद प्रशासनाने तातडीने आपत्कालीन उपाययोजना हाती घेतल्या.
 
पावसाची तीव्रता आणि शहरातील परिस्थितीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधला. नागरिकांची गैरसोय होऊ नये, सखल भागांतील पाण्याचा निचरा त्वरित व्हावा आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी त्यांनी आवश्यक सूचना दिल्या. नगराध्यक्ष सचिन सातव आणि मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्या परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत होत्या.
 
दिवंगत अजित पवार यांनी बारामतीला विकासाची दिशा देतानाच कामाची एक विशिष्ट शिस्त आणि कार्यपद्धती घालून दिली आहे. कोणतीही अडचण आली किंवा संकट उभे राहिले, तर नागरिकांच्या मदतीला तत्काळ धावून जायचे, ही त्यांची शिकवण आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांच्या सूचनांनुसार आम्ही सर्वांनी एकत्रितपणे काम केले. नगरसेवकांनीही नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांसोबत प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम केले. अवघ्या दोन तासांत प्रमुख रस्त्यांवरील पाण्याचा निचरा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. नागरिकांची गैरसोय कमीत कमी व्हावी, यालाच आम्ही प्राधान्य दिले. 
 
-  सचिन सातव, नगराध्यक्ष, बारामती नगरपरिषद
 
शहरात अवघ्या काही तासांत १५८ मिमी पावसाची नोंद झाली. अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे काही सखल भागांत पाणी साचले होते.  पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक यंत्रणा कामाला लावण्यात आली. नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष फिल्डवर उपस्थित राहून काम करत होते. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक विभागाशीही समन्वय साधण्यात आला. परिणामी, अवघ्या दोन तासांत मुख्य भिगवण रस्त्यासह अन्य प्रमुख रस्त्यांवरील पाण्याचा निचरा करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. नागरिकांची सुरक्षितता आणि गैरसोय टाळणे यालाच प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले.
 
- पंकज भुसे, मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद
 

Related Articles