बॉम्बने न्यायालय उडवून देण्याची ई-मेलद्वारे धमकी   

बॉम्बशोधक पथकाद्वारे तपासणी

सोलापूर, (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने सोमवारी न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी न्यायालयात बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याचा उल्लेख या ई-मेलमध्ये करण्यात आला होता. यानंतर बॉम्बशोधक पथकासह सर्व पोलिस यंत्रणां न्यायालयाच्या आवारात शोधमोहिम सुरु केली परंतु दुपारपर्यंत त्यांना काहीच मिळाले नाही. ही केवळ धमकी असल्याचे निष्पन्न झाले.
 
सोलापूर न्यायालयात बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई मेल जिल्हा व सत्र न्यायाधिशांच्या मेलवर आला. या धमकीनंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी तातडीने न्यायालय परिसर रिकामा करण्याच्या लेखी सूचना दिल्या. ही माहिती मिळताच शहर पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी व त्यांची संपूर्ण टिम तातडीने न्यायालयात दाखल झाली. सोमवार हा न्यायालयीन कामकाजाचा दिवस असल्याने न्यायालयात मोठी गर्दी होती. सुमारे साडेचारशेहून अधिक वकील, एक ते दीड हजार पक्षकार तसेच न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करणारे शंभरहून अधिक कामगार परिसरात उपस्थित होते. 
 
ही बातमी पसरताच न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि कर्मचार्‍यांची एकच धावपळ उडाली. न्यायालयाची मुख्य इमारत, दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) इमारत, मुख्य न्याय दंडाधिकारी इमारत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (डीएलएसए) इमारत आणि न्यायालय परिसरातील बार रूमसह संपूर्ण परिसर तातडीने रिकामा करण्यात आला. सर्वांना पोलिस बंदोबस्तात न्यायालयाच्या बाहेर काढण्यात आले. पोलिसांचा मोठा फौजफाटा न्यायालयात दाखल झाल्यानंतरही सुरुवातीला अनेकांना नेमका प्रकार समजत नव्हता. मात्र, वकिलांमधील चर्चेतून बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल आल्याचे समजल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. 
 
पोलिसांच्या बॉम्बधोशक पथकाने तातडीने शोधमोहिम सुरु केली. गुन्हे शाखेचा एक व बीडीडीएस पथकाचा एक अशा दोन श्वानांव्दारे तसेच बॉम्बशोधक यंत्राव्दारे संपूर्ण न्यायालयाचा परिसर तपासण्यात आला. या मेल मध्ये ३ वाजून ११ मिनिटांनी बॉम्बने उडविणार असा उल्लेख होता. त्यामुळे बॉम्बशोधक पथकाने प्रत्येक कानाकोपर्‍यात जाऊन शोध घेतला; परंतु पोलिसांना काहीही संशयास्पद सापडले नाही. दुपारी चारच्या सुमारास सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी न्यायालयाच्या बाहेर पडले. यावेळी न्यायालयात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. ही धमकी कुणी दिली, कशासाठी दिली याचा तपास पोलिस करीत आहेत.
 
न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल आल्याचे कळताच पोलिस उपायुक्त डॉ. आश्विनी पाटील, प्रितम यावलकर, सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर, दिलीप पवार, विजयालक्ष्मी कुर्री, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, सदर बझारचे अजित लकडे, जेलरोड पोलिस ठाण्याचे उदयसिंह पाटील, सायबरचे भालचंद्र ढवळे हे तातडीने न्यायालयात दाखल झाले. त्यांच्यासोबत बीडीडीएस तसेच इतर पथकांचे कर्मचारी होते.
 

Related Articles