जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडविण्याची धमकी; परिसर रिकामा   

अहिल्यानगर : जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडविण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने काल (सोमवारी) न्यायालयीन परिसरात मोठी खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना तातडीने न्यायालयाबाहेर काढण्यात आले.
 
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी, बॉम्बशोधक व नाशक पथक आणि एसआरपीची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. संपूर्ण न्यायालयीन इमारत, विविध विभाग आणि परिसराची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी लष्कराच्या अधिकार्‍यांनीही मदत केली. नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
 
दरम्यान, तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एम. सुदर्शन यांनी दिली. धमकीचा ई-मेल कोणी व कुठून पाठविला, तसेच त्यामागील उद्देश काय, याचा सायबर सेलमार्फत तपास सुरू आहे. या घटनेमुळे न्यायालयीन कामकाज काही काळ ठप्प झाले होते.

Related Articles