भूसंपादनासाठी महापालिका उचलणार 450 कोटींचे कर्ज   

पुणे : शहरातील महत्त्वाकांक्षी एचसीएमटीआर मार्गिका आणि अंतर्गत रिंगरोडच्या भूसंपादनासाठी महापालिका 450 कोटी रुपयांचे कर्ज उभारणार आहे. यासाठी कॉसमॉस सहकारी बँकेत 500 कोटी रुपयांच्या ठेवी ठेवून त्यावर 90 टक्के कर्ज घेण्याचा प्रस्ताव आयुक्त नवल किशोर राम यांनी स्थायी समितीसमोर ठेवला होता. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.एचसीएमटीआर, अंतर्गत रिंगरोड आणि त्यांना जोडणार्‍या भुयारी मार्गांसाठी सुमारे तीन ते चार हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एचसीएमटीआरसाठी 20 टक्क्याहून अधिक खासगी जागांचे भूसंपादन करावे लागणार आहे. तर अंतर्गत रिंगरोडसाठी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए यांना भूसंपादन करावे लागणार आहे.
 
विशेष म्हणजे, यापूर्वी महापालिकेचा निधी प्रामुख्याने एचडीएफसी आणि आयसीआयसीआय यांसारख्या बँकांमध्ये ठेवण्यात येत होता. मात्र, आता महापालिका अधिनियमातील कलम 92 चा आधार घेत सहकारी बँकेत ठेवी ठेवून त्यावर कर्ज उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महापालिकेने यापूर्वी समान पाणीपुरवठा योजनेसाठी 200 कोटी रुपयांचे रोखे काढले होते. तसेच जायका प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 815 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळविले आहे. असे असताना एचसीएमटीआर आणि रिंगरोडच्या भूसंपादनासाठी सहकारी बँकेकडून कर्ज घेण्याची वेळ आल्याने महापालिकेच्या आर्थिक नियोजनावर चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles