दिवाळी बचत बाजारात दोन दिवसांत 30 लाखांची उलाढाल   

महापालिकेच्या पुढाकारातून 13 ठिकाणी प्रदर्शन

पुणे: दिवाळीच्या सणानिमित्त महापालिकेच्या समाज विकास विभागाने आयोजित केलेल्या दिवाळी बचत बाजाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील 13 ठिकाणी सुरू असलेल्या या प्रदर्शन-विक्री उपक्रमात पहिल्या दोन दिवसांत सुमारे 30 लाख 10 हजार 654 रुपयांची उलाढाल झाली आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. या माध्यमातून तब्बल 1,415 बचत गटांना विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
 
महापालिकेच्या वतीने आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यान येथे झाले. शहरातील विविध भागांमध्ये लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रदर्शनांचे उद्घाटन करण्यात आले. कोथरूड, कर्वेनगर, बालगंधर्व रंगमंदिर, खराडी, बिबवेवाडी, घोरपडी, वानवडी, वडगाव शेरी, कात्रज, वारजे माळवाडी आणि धानोरीसह विविध ठिकाणी हे बाजार भरविण्यात आले आहेत.
 
या प्रदर्शनात महापालिका हद्दीतील महिला बचत गटांबरोबरच दिव्यांग लाभार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले आहेत. दिवाळी फराळातील चकली, लाडू, करंजी, शंकरपाळी, चिवडा, शेव आणि अनारसे यांसह विविध खाद्यपदार्थांना येथे बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर बिर्याणी, शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थ, मसाले, पापड, लोणची, तयार पिठे, शेवया आणि कुरड्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.घरगुती वापराच्या वस्तू, तयार कपडे, रांगोळी, तोरण, आकाशकंदील, पणत्या, अगरबत्ती, दागिने, सौंदर्यप्रसाधने आणि आयुर्वेदिक उत्पादनांचाही प्रदर्शनात समावेश आहे. 

Related Articles