जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया   

महापालिकेचे दुर्लक्ष

येरवडा : राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात लाखो लिटर पाण्याची उघडपणे नासाडी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहिल्या नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूलाच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर पाण्याचे पाट वाहात होते. शिवाय खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचलेले होते.
 
प्रशासनाचा निष्काळजीपणा
 
शास्त्रीनगर चौकात सध्या उड्डाणपूलाचे काम गतीने सुरू आहे. या कामासाठी रस्त्यावर खड्डे खोदत असताना कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे येथील मुख्य जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्याचे तात्काळ लक्षात येऊनही प्रशासनाने किंवा संबंधित कंत्राटदाराने ती तातडीने दुरुस्त करण्याचे कष्ट घेतले नाहीत. या गंभीर दुर्लक्षामुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावरून वाया गेले.
 
ऐन सणासुदीत पाणीटंचाईचे सावट
 
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पाणीटंचाईचे सावट असून नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यातच ऐन सणासुदीच्या काळात महानगरपालिकेने शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची घोषणा केली आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत एकीकडे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे महापालिकेच्या डोळ्यादेखत लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जलवाहिनी फुटल्यानंतर स्थानिक नागरिक आणि समाजसेवकांनी तात्काळ महापालिका प्रशासनाकडे धाव घेतली. दिवसभर सातत्याने पाठपुरावा आणि तक्रारी केल्यानंतर, अखेर संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे कर्मचारी जागे झाले. 

Related Articles