आशिया चषकासाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा   

तिलक वर्माकडे कर्णधारपद, अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीलाही संधी

नवी दिल्‍ली : आगामी पुरुष रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारत ‘अ’ संघाची घोषणा केली आहे. दोहा येथे 19 ते 29 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची निवड करण्यात आली असून, युवा फलंदाज तिलक वर्मा याच्याकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर अनुभवी फलंदाज रजत पाटीदार याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
 
या संघात भारताचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा आणि युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी यांना स्थान मिळाले आहे. त्यामुळे या दोघांच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. याशिवाय यष्टीरक्षक-फलंदाज प्रभसिमरन सिंग आणि कुमार कुशाग्र यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे आणि शाहबाज अहमद यांनाही संधी देण्यात आली आहे.अष्टपैलू खेळाडू म्हणून विप्राज निगम, हर्ष दुबे आणि तनुष कोटियन यांची निवड झाली आहे. तर वेगवान गोलंदाजीची धुरा हर्षित राणा, प्रिन्स यादव आणि अर्शद खान यांच्याकडे असेल.
 
पाकिस्तानविरुद्ध भारताचा सामनाभारत ‘अ’ संघाला गट ‘ब’ मध्ये स्थान देण्यात आले आहे. या गटात पाकिस्तान ‘अ’, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) या संघांचाही समावेश आहे. भारत आपल्या मोहिमेची सुरुवात 20 नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्धच्या सामन्याने करेल. त्यानंतर 22 नोव्हेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. तर 24 नोव्हेंबर रोजी भारतीय संघ यूएईविरुद्ध खेळेल.दोन्ही गटांतील प्रत्येकी दोन अव्वल संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. 26 आणि 27 नोव्हेंबरला उपांत्य फेरीचे सामने होतील. तर स्पर्धेचा अंतिम सामना 29 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.
 
भारत ‘अ’ संघ : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग, तिलक वर्मा (कर्णधार), रजत पाटीदार (उपकर्णधार), रिंकू सिंग, कुमार कुशाग्र, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विप्राज निगम, हर्ष दुबे, तनुष कोटियन, हर्षित राणा, प्रिन्स यादव आणि अर्शद खान.

Related Articles