चेन्नई ओपनला पावसाचा फटका!   

पहिल्या दिवशीचे सर्व सामने रद्द; आज रंगणार 16 सामने 

चेन्नई : चेन्नईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका डब्ल्यूटीए 250 चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेला बसला आहे. सततच्या पावसामुळे स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमधील पहिल्याच दिवसाचा संपूर्ण खेळ रद्द करण्याचा निर्णय आयोजकांना घ्यावा लागला. सोमवारी नियोजित असलेल्या 10 पैकी एकही सामना खेळवता आला नाही. त्यामुळे टेनिस चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.
 
सोमवारी दुपारी 3 वाजता सामन्यांना सुरुवात होणार होती. मात्र, दुपारनंतर रिमझिम पावसाचे रूपांतर मुसळधार पावसात झाले. त्यामुळे मैदानावरील कोर्ट खेळण्यासाठी योग्य राहिले नाहीत. परिस्थिती लक्षात घेऊन आयोजकांनी दिवसातील सर्व सामने रद्द केले.आता हे सर्व सामने मंगळवारी खेळवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून खेळाला सुरुवात होणार असून, महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सर्व 16 सामने एकाच दिवशी खेळवले जाणार आहेत. हवामानाने साथ दिल्यास नियोजित वेळापत्रक पूर्ण करण्याचा आयोजकांचा प्रयत्न असेल.
 
दरम्यान, चेन्नईमध्ये ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय असून, बंगालच्या उपसागरातील ’मुरसू’ या तीव्र चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता आणखी वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने चेन्नईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हे चक्रीवादळ दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत असल्याने स्पर्धेच्या पुढील दिवसांवरही पावसाचे सावट आहे.स्पर्धेचे संचालक हितेन जोशी यांनी सांगितले की, चेन्नईतील या काळातील हवामानाची आव्हाने सर्वांनाच माहीत आहेत. मात्र, डब्ल्यूटीएच्या वेळापत्रकामुळे स्पर्धा याच कालावधीत आयोजित करावी लागत आहे. त्यामुळे आता पुढील सामने सुरळीत पार पडण्यासाठी हवामानाची साथ मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles