खुशबूचे ज्युदोमध्ये पदक निश्‍चित ; धिनिधीची अंतिम फेरीत धडक   

डकार (सेनेगल) : युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. ज्युदोमध्ये भारताच्या 15 वर्षीय खुशबू राजकभाई दरजादाने अंतिम फेरीत प्रवेश करत किमान रौप्यपदक निश्चित केले आहे. तर जलतरणपटू धिनिधी देसिंघू हिने महिलांच्या 100 मीटर फ्रीस्टाइल प्रकाराच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
 
गुजरातच्या खुशबूने महिलांच्या 63 किलो वजनी गटात शानदार खेळ केला. तिने उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोच्या अबीर बोआझाउईचा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत अल्जेरियाच्या दुनिया बेराहुलला नमवत अंतिम फेरी गाठली. आता सुवर्णपदकासाठी तिची लढत जर्मनीच्या कॅडेट विश्वविजेत्या जोलिना रेनहोल्डशी होणार आहे. खुशबूने अंतिम सामना जिंकल्यास युवा ऑलिम्पिकमध्ये ज्युदोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरेल. यापूर्वी 2018 मध्ये थांगजाम तबबी देवीने ज्युदोमध्ये रौप्यपदक जिंकले होते.
 
दरम्यान, बेंगळुरूच्या 16 वर्षीय धिनिधी देसिंघूने महिलांच्या 100 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात 56.80 सेकंदांची वेळ नोंदवत आपल्या हीटमध्ये पहिले स्थान मिळवले. सर्व स्पर्धकांमध्ये तिने तिसरी सर्वोत्तम वेळ नोंदवली. त्यामुळे तिला अंतिम फेरीत स्थान मिळाले. युवा ऑलिम्पिकच्या जलतरण अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.विशेष म्हणजे, धिनिधीने 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिच्या या कामगिरीमुळे भारतीय जलतरण क्षेत्रासाठी नवी आशा निर्माण झाली आहे.

Related Articles