शक्तिप्रदर्शनातून इशारा (अग्रलेख)   

राजधानीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. केंद्र सरकारसाठी हा इशारा आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तातडीने हटवावे, ही विरोधकांची मुख्य मागणी. देशभरात राबविल्या गेलेल्या मतदार यादी पडताळणी मोहिमेनंतर असंख्य मतदारांची नावे वगळली गेली. भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे कधीही रुजलेली नव्हती, अशा पश्‍चिम बंगालसारख्या राज्यातही तो पक्ष सत्तेवर आला. यामागे पडताळणी मोहिमेनंतर मतदार याद्यांचे पूर्णतः बदलून गेलेले स्वरूप आहे, असा संशय घेण्यास नक्कीच जागा आहे. तेथील निवडणुकीच्या तोंडावर न्यायालयातही दाद मागण्यात आली. कायद्यातील तरतुदीनुसार ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार आहे; पण तो बजावल्यावर सर्वच विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता का? याचे उत्तर आयोगाने द्यायला हवे. ते अर्थात मिळणार नाही. म्हणूनच मतचोरीचा आरोप करत विरोधक रस्त्यावर उतरले. काही दिवसांपूर्वी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगावर आणि सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्यात आला. ही पार्श्‍वभूमी आणि फ्रान्स, इटली, जर्मनीसह अनेक युरोपीय देशांमध्ये सुरू झालेल्या हिंसक आंदोलनाचा संदर्भ, यामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या मेळाव्यामुळे काय घडणार? याबद्दल शंका उपस्थित केल्या गेल्या. दहा लाख नागरिकांची उपस्थिती राहील, असे काँग्रेसकडून सांगण्यात येत होते. ती संख्या गाठता आली नसली तरी मेळाव्यामुळे कायदा - सुव्यवस्थेला बोट लागले नाही. अन्यथा, परकीय शक्तींशी हातमिळवणी करून विरोधकांना अराजक माजवायचे आहे, या भाजपच्या प्रचारात तथ्य असल्याचा नागरिकांचा समज होण्याचा धोका होता. भाजपचा सामना करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. आज मोदी सरकारला मित्र पक्षांच्या मदतीने सरकार चालवावे लागत आहे. ती संधी नितीशकुमार यांना दूर करून विरोधकांनीच मिळवून दिली.
 
तरच विश्‍वासार्हता वाढेल
 
नियोजनाबाबत मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने प्रगल्भता दाखवली. अलीकडे अशा प्रगल्भतेचे दर्शन काँग्रेसकडून दुर्मीळ झाले होते. यात सातत्य राहिले तरच जनसामान्यांमध्ये विरोधी पक्षांना विश्‍वासार्हता टिकवता आणि वाढवता येईल. राहुल गांधी सत्ताधारी भाजपचे मुख्य लक्ष्य असतात. अशावेळी, रामलीला मैदानावरून त्यांनी मांडलेली समतोल, मात्र ठाम भूमिका भाजपला सहजासहजी दुर्लक्ष करता येणारी नाही. ‘आम्हाला हिंसाचार नको आहे’, हे त्यांनी नि:संदिग्धपणे सांगितले, हे महत्त्वाचे. भारत प्रजासत्ताक झाल्यावर आतापर्यंत जेव्हा जेव्हा सत्ता परिवर्तन झाले ते शांततेच्या मार्गाने आणि निवडणुकीद्वारे. युरोपियन देशातील अराजकाच्या पार्श्‍वभूमीवर त्या प्रकारचा अनर्थ येथे होता कामा नये आणि तसा बाह्यशक्तींचा प्रयत्न असल्यास राजकीय पक्षांनी त्यास हातभार लावता कामा नये. तो दिलासा विरोधकांनी एकमुखाने दिला. आता ज्या प्रक्रियेवर लोकशाही व्यवस्थेची भिस्त आहे त्यात पूर्णतः पारदर्शकता आणण्याची मुख्य जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे आणि केंद्र सरकारने देखील संवादाचा मार्ग स्वीकारून शंका, संदेह याला थारा मिळणार नाही, हे पाहिले पाहिजे. लोकशाहीचे आदर्श उदाहरण म्हणून भारताला यापुढेही स्थान टिकवायचे असेल, तर मनमानी, राजकीय हितसंबंधात गुंतलेले निर्णय, हे खपवून घेता येणार नाही. मेळाव्यासाठी राजधानीत येणार्‍या कार्यकर्त्यांची मोठी संख्या लक्षात घेता विशेष रेल्वे सोडणे स्वाभाविक ठरले असते; पण ते भाजपच्या स्वभावाविरुद्ध आहे! दिल्लीत प्रवेश करणार्‍या वाहनांच्या बाबतीत प्रदूषणाचे नियम लादण्यासाठी देखील रामलीला मैदानावरील मेळाव्याच्या दिवसाचा मुहूर्त मिळाला! या प्रकारची कोंडी करणे लोकशाही मूल्यांना शोभणारे नाही. त्याच दिवशी भाजपने विरोधकांवर अराजक पसरवत असल्याचा आरोप करत पदयात्रा काढल्या. विरोधकांच्या भूमिकेला नंतर उत्तर देता येणे शक्य होते. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव, पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्यासह अन्य विरोधी पक्ष नेते मेळाव्यास आवर्जून उपस्थित होते, हे वैशिष्ट्य म्हणता येईल. कम्युनिस्ट पक्षाचे समर्थक मोठ्या संख्येने होते. हे ऐक्य टिकले तरच आव्हान कायम राहील. 

Related Articles