E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
संपादकीय
सुशिक्षितांनी नाकारले; महायुतीत मिठाचा खडा
Wrutuja pandharpure
03 Nov 2026
मुंबई वार्तापत्र , अभय देशपांडे
विधानपरिषदेच्या पाच शिक्षक व पदवीधर मतदारसंघांची निवडणूक मागच्या आठवड्यात पार पडली. मतचोरी व एसआयआर वरून देशभरात आंदोलन सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या, जेन झीच्या आंदोलनामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर होणार्या विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर, उच्च शिक्षित मतदार काय कौल देतात याबद्दल बरेच कुतूहल होते. या निवडणुका ईव्हीएम नाही तर मतपत्रिकेवर होत असल्याने त्यांच्या निकालाबाबत शंका घ्यायला कोणालाही संधी नव्हती.
देशभरात 28 जागांसाठी निवडणूक झाली. त्यातील 16 जागा भाजपा व मित्रपक्षांना मिळाल्या. पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक यश एनडीएला मिळाले; परंतु वाराणसी, लखनौ, पाटणा अशा अनेक प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपचा पराभव झाल्याने भाजपच्या विजयाचा आनंद हिरावला गेला. वाराणसी व लखनौमध्ये सत्ताधारी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. या दोन्ही जागांवर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाने दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील हे निकाल भाजपासाठी चिंता वाढवणारे आहेत. त्यापेक्षाही काँग्रेसला नागपूर ही एकमेव जागा जिंकूनही विजय साजरा करण्याची संधी मिळाली. याचे भाजपला अधिक दुःख वाटत असावे. नागपूर पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी बराच काळ चालली. सुरुवातीच्या काळानुसार ही जागा भाजपा जिंकेल व काँग्रेसची पाटी कोरी राहणार, अशी चिन्हे होती. त्यामुळे मतपत्रिकेवर निवडणूक होऊनही काँग्रेस हरली अशा आशयाचे उपरोधिक ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते रिट्विट केले; परंतु मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात बाजी पलटली. काँग्रेसचा विजय व भाजपाचा पुन्हा एकदा पराभव झाला. यामुळे ट्विट डिलीट करण्याची नामुष्की आली. महाराष्ट्रातील 5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली. पदवीधर मतदारांनी तिन्ही ठिकाणी महायुतीला पराभवाचा धक्का दिला. दोन शिक्षक मतदारसंघांनी थोडाफार आधार दिला. नागपूर व पुण्याचा पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला. स्वातंत्र्यानंतर कायम जिंकत आलेला नागपूर पदवीधरचा बालेकिल्ला मागच्या निवडणुकीत काँग्रेसकडे गेला होता. तो परत खेचून आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली सगळी ताकद पणाला लावली होती; परंतु यश मिळाले नाही. उलट नागपूरमुळे पंतप्रधानांवर तोंडघशी पडण्याची वेळ आली. पुण्यात तेच झाले. ऐनवेळी नवीन उमेदवार रिंगणात उतरण्याची खेळी भाजपाच्या अंगाशी आली. विधान परिषदेचे पदवीधर मतदारसंघ म्हणजे एकेकाळी भाजपचे बालेकिल्ले होते. या मतदारसंघांवर भाजपचे एकतर्फी वर्चस्व असायचे.आता राज्यातील सात पदवीधर मतदारसंघापैकी केवळ कोकणात भाजपचा आमदार आहे.
पराभूत सैन्यात यादवी होते असं म्हणतात. मग ही निवडणूक तरी याला कशाला अपवाद होईल? पराभवाचा दणका बसलेल्या भाजपाने याचे खापर आपल्या मित्रपक्षावर व विशेषतः शिवसेनेवर फोडले आहे. संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सतीश चव्हाण यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे पराभवाबद्दल त्यांना जबाबदार धरत भाजपाने जोरदार टीका केली. शिवसेनेने आमचा केसाने गळा कापला, त्यांना युतीत राहायचे आहे की नाही ? अशी टोकाची भाषा वापरली. त्याला शिवसेनेनेही तेवढ्याच आक्रमकपणे उत्तर दिले. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी भाजपला विरोध केला ही वस्तुस्थिती असली तरी नागपूरला अशी कुठलीही परिस्थिती नसताना लोकांनी सलग दुसर्यांदा भाजपाला लोळवले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शहरात काँग्रेस पक्षाने सलग दुसर्यांदा भाजपचा पराभव केला आहे. अवैध मतांचे आकडे पाहता भाजपच्या नाराज मतदारांनी पक्षाला धडा शिकवल्याची चर्चा आहे. पुणे पदवीधर मतदार संघातही भाजपला मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख -जाधव या येथून विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या डॉ. स्मिता जाधव यांचा पराभव केला. खरं तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची होती. गेल्या निवडणुकीत त्यांचे अरुण लाड येथून विजयी झाले होते. त्यांचे चिरंजीव शरद लाड यावेळी भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक होते; पण अजित पवार यांच्या निधनानंतर क्षीण झालेल्या राष्ट्रवादीकडून ही जागा भाजपाने हिरावून घेतली आणि डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली. नाराज राष्ट्रवादीने तटस्थ भूमिका घेतली. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी थेट विरोधाची भूमिका घेतली. त्यामुळे भाजपा येथे एकाकी पडली व पराभवाचा झटका बसला. संभाजीनगरमध्ये सलग तीन वेळा निवडून आलेल्या सतीश चव्हाण यांच्या विरोधात वातावरण होते. तरीही त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. याच सतीश चव्हाणांनी विधानसभेची निवडणूक शरद पवार गटातून लढवली होती व पराभूत झाले होते. गट बदलला नसता तर कदाचित तेच शरद पवार गटाचे उमेदवार असते; पण त्यांनी बाजू बदलल्यामुळे शरद पवार गटाला भाकरी फिरवण्याची संधी मिळाली. शरद पवार गटाने पुणे व संभाजीनगर या दोन जागा लढवल्या व दोन्ही जिंकल्या आहेत. पुण्याची जागा भाजपाला सोडणे, संभाजीनगरमध्ये सतीश चव्हाण यांना दिलेली उमेदवारी यावरून राष्ट्रवादीत अंतर्गत कलहाचे लवंगी फटाके फुटत आहेत. यशाला अनेक बाप असतात व अपयश पोरके असते असं म्हणतात ते उगाच नाही.
तुझे माझे जमेना, अन्.......
विधानपरिषदेचा पराभव भाजपाच्या चांगलाच जिव्हारी लागला. भाजपाचे नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नवनाथ बन, केशव उपाध्ये आदींनी निकालानंतर एका सुरात शिवसेनेवर हल्ला केला. शिवसेनेने केसाने गळा कापल्याचा आरोप केला. पुण्यात महायुतीचा उमेदवार असतानाही शिवसेनेने ऐनवेळी अपक्ष सचिन सानप यांना पाठिंबा दिला. सानप यांना शिक्षक मतदारसंघात मिळालेल्या मतांचा परिणाम पदवीधर मतदारसंघाच्या निकालावरही झाला, असा दावा करण्यात आला. महायुतीत राहायचे असेल तर युतीधर्म पाळावा लागेल, असेही सुनावण्यात आले; पण बदललेल्या राजकारणामुळे या टीकेला त्याच भाषेत प्रत्त्युत्तर मिळाले. शिंदे यांचे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे विधानपरिषदेतील पराभवाचे निमित्त करून शिंदे यांच्याविरुद्धचा संघर्ष दिल्लीपर्यंत नेण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न होता; परंतु स्थानिक पातळीवरचे मतभेद तेथेच चर्चेने मिटवा, फार ताणू नका, असा सल्ला दिल्लीच्या नेत्यांनी दिला आहे. बदललेल्या राजकारणामुळे भाजपाचा धाक कमी होत आहे.
Related
Articles
पुरूष सांघिक 50 मीटर नेमबाजीत भारताला सुवर्ण
04 Nov 2026
झुंजार अन् जिगरबाज!
08 Nov 2026
दिवाळीसाठी पिंपरी आगारातून 410 बसफेर्यांचे नियोजन
09 Nov 2026
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)
05 Nov 2026
किरकोळ वादातून मुलाकडून वडिलांचा खून
08 Nov 2026
भारताविरोधात अमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय षडयंत्र
04 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित