‘फेडरल रिझर्व’च्या निर्णयावर सोन्याचे भाव अवलंबून   

वृत्तवेध 

नवरात्री आणि दसर्‍याच्या दरम्यान सोन्याच्या दरातील घसरणीमुळे सोने खरेदी करणार्‍यांची आशा वाढली आहे. दिवाळीच्या काळात भारतात सोन्याची खरेदी वाढते. यामुळे दरांमध्ये घसरण कायम राहिल्यास दागिने खरेदी करणार्‍यांना फायदा होईल. सोन्याच्या दरांमध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे निर्माण झालेला तणाव, कच्चा तेलाच्या दरातील वाढ, अमेरिकेच्या व्याज दरासंदर्भातील अनिश्‍चितता याचा सोन्याच्या दरावर परिणाम झाला आहे.
 
क्रूड ऑईलच्या दरातील वाढ हे सोन्याच्या दरातील घसरणीचे मुख्य कारण आहे. आखाती देशांमधील वाढत्या भूराजनैतिक तणावामुळे तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ब्रेंट क्रूड ऑईलचे दर पाच महिन्याच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. येमेनच्या इराणसमर्थित हुथी गटाने सौदी अरेबियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर, विमानतळावर आणि सैन्यतळांवर हल्ले होत असल्याने बाजारातील चिंता वाढली आहे. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने ट्रान्सपोर्ट, उत्पादन खर्च वाढतो. यामुळे जगभरातील केंद्रीय बँका व्याजदरात कपात करण्यापासून लांब राहतात. 
 
सोन्याचे आगामी काळातील दर निश्‍चित करण्यासाठी अमेरिकेच्या ‘फेड रिझर्व्ह’ची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे ‘फेडरल रिझर्व्ह’च्या हालचालींकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागलेले आहे. व्याजदर स्थिर राहिल्यास किंवा न वाढल्यास सोन्याच्या दरांना आधार मिळू शकतो. व्याजदर दीर्घकाळ उच्च राहणार असल्याचे संकेत मिळाल्यास सोन्याच्या दरावर दबाव पाहायला मिळू शकतो. दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात वाढ होणार की सोन्याचे दर घसरणार हे क्रूड ऑईलचे दर किती वाढतात यावर अवलंबून असेल. क्रूड ऑईलचे दर वाढले आणि अमेरिकेच्या व्याजदरात वाढीची शक्यता वाढल्यास सोन्याच्या दरात तेजी आणि घसरण पाहायला मिळू शकते.

Related Articles