E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
संपादकीय
वाचक लिहितात
Wrutuja pandharpure
03 Nov 2026
भारतीय नेतृत्वाचा बाणेदारपणा!
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत व्हेटोचा अधिकार मिळावा म्हणून भारत गेली 70 वर्षे प्रयत्नरत होता; परंतु अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, रुस आणि चीन या पाच महाशक्तींच्या तालावर नाचणार्या या परिषदेने भारताला हा अधिकार दिला नाही. नेहमीच चीनने पडद्यामागे राहून याला विरोध केला होता; पण अचानक संयुक्त परिषदेने भारताकडे तुम्हाला स्थायी सदस्यत्व देतो, असा प्रस्ताव पाठवला. हा प्रस्ताव बघून भारत खूश होईल आणि आपल्या जाळ्यात अडकेल असा त्यांचा समज होता. हे सदस्यत्व देताना भारताला नकाराधिकार मिळणार नाही, अशी तरतूद त्यामध्ये होती.
म्हणजे स्थायी सदस्यत्व मिळूनही भारताच्या मताला काही किंमत नाही, असाच त्याचा अर्थ होता. केवळ शोभेची बाहुली होऊन खुर्चीवर बसणे भारताला अमान्य होते. विना अधिकाराचे पद म्हणजे दात आणि नखे काढलेल्या सिंहासारखी अवस्था! या जाळ्यात भारत सापडला नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व आम्हाला नको, असे भारताने ठणकावून सांगितले. या निर्णयाने या महाशक्तींना धक्का बसला. चीनचा अंतस्थ हेतु निष्फळ ठरला. आजचा भारत बदललेला आहे. तो 62चा भारत राहिलेला नाही. आशिया खंडातील सर्वांत मोठी आणि सशक्त लोकशाही असलेला 140 कोटी जनतेचा हा स्वाभिमानाने जगणारा देश आहे.
दुसर्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली. त्याचा उद्देश असा होता की, युद्धाने प्रश्न सुटत नाहीत. जगात शांतता प्रस्थापित व्हावी आणि सर्वांना स्वाभिमानाने जगता यावे; परंतु संयुक्त राष्ट्रात सुरक्षा परिषदेचे नेतृत्व करणारे देश यापासून फार लांब आहेत, असे परखड विचार भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जगासमोर यापूर्वीच मांडले आहेत.
युक्रेन-रशिया युद्ध असो किंवा अमेरिका-इराण युद्ध असो, सुरक्षा परिषदेने कोणतेही ठाम पाऊल उचलले नाही, युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. वैश्विक मंचावर अशा संस्थांचा सहभाग नसेल, तर त्यांचा काय उपयोग!
भारताकडे पाहण्याचा असंख्य देशांचा दृष्टीकोन अलीकडच्या काळात बदलला असून तो दृष्टीकोन सकारात्मक आहे. अडचणीत असणार्या प्रत्येक राष्ट्राला भारत आपल्याला साहाय्य करेल, दगा देणार नाही अशी खात्री पटली आहे.
मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया या संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याने औषध निर्मिती, उपचार पद्धती, अन्नधान्य उत्पादन, रस्ते बांधणी, आधुनिक तंत्रज्ञान विकास अशा सर्व क्षेत्रात भारत आघाडीवर आहे. नकाराधिकार न देता केवळ स्थायी सदस्यत्व देऊन आपल्या दबावाखाली ठेवण्याचा महाशक्तींचा प्रयत्न अपयशी ठरला! आम्हाला कोणाच्या देयेची भीक नको, आमचे प्रश्न आमच्या हिमतीवर आम्ही सोडवू शकतो हेच हा प्रस्ताव फेटाळून 140 कोटी जनता असणार्या भारताने सर्व जगाला दाखवून दिले. या कृतीचा सर्व भारतीयांना अभिमान वाटतो.
’स्वाभिमानाने जगा आणि दुसर्याच्याही स्वाभिमानाला धक्का देऊ नका’ असा प्रेरणादायी संदेश सर्व जगाला या निमित्ताने दिला गेला. भारताला झुकवण्याचे, नमवण्याचे, आपल्या अधिपत्याखाली ठेवण्याचे स्वतःला महासत्ता म्हणवून घेणार्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.
संध्या काटदरे, माणगाव, रायगड
सरकारवर परिणाम नाहीच
वादग्रस्त ठरलेले निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी इंडिया आघाडीने रामलीला मैदानावर शक्तिप्रदर्शन केले. यासाठी आंदोलने केली जात आहेत; परंतु त्याचा सत्ताधारी पक्षावर कसलाच परिणाम दिसून येत नाही. उलट पोलिसांकडून विरोधकांना ताब्यात घेणे, त्यांच्यावर लाठीहल्ला करणे असले निंदनीय प्रकार सुरू आहेत. राहुल गांधी यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, ‘दिल्ली अभी बहुत दूर है!’ आता कुठे या संदर्भात न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. या बाबतीत एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती अशी की, सुरुवातीला जेव्हा न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला, त्यावेळेस त्यात चौदा त्रुटी होत्या. न्यायालयाने ते निदर्शनास आणल्यानंतर, त्यात सुधारणा करून पुन्हा नव्याने तो दाखल करण्यात आला आहे. अर्जावर न्यायालयाकडून कधी निकाल लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे तोपर्यंत प्रतीक्षा करत बसण्यावाचून गत्यंतर नाही! साम, दाम, दंड व भेद या चारही गोष्टींचा वापर करून सत्तेवर आलेला सत्ताधारी पक्ष ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेईल, अशी अजिबात शक्यता नाही! ज्ञानेश कुमार जर खरेच निर्दोष असतील तर, ते भारतीयांसमोर ठामपणे स्वत:ची बाजू मांडण्याचीहिंमत का दाखवत नाहीत?
गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई
अवमान करणे टाळा
’रामलीला मैदानावर विरोधकांचे शक्ती प्रदर्शन’ ही बातमी वाचून एकच गोष्ट ठीक वाटली म्हणजे सर्व विरोधी पक्ष एका मंचावर एकत्र दिसले. सर्वजण आपापल्या परीने सरकारविरोधात बोलले. पण अभिरूप संसद भरवून, त्यात महाभियोग चालवून प्रत्यक्ष काहीही होत नसते, हे सर्वसामान्य जनता सुद्धा जाणते. त्यातच पंतप्रधानांना एकेरीत संबोधणे नागरिकांना रुचणारे नव्हते. याची सुरुवात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. ज्यांना इतरांचा मान ठेवता येत नाही त्यांनी स्वतःला मान मिळणे गृहीत धरू नये. फक्त अशांतता व अराजकता फैलावून फार काही साध्य होणार नाही, हे विरोधी पक्षांनी लक्षात घ्यावे.
माया भाटकर, पुणे
दूध व्यवसायाला मोठा फटका
यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळाचा फटका केवळ शेतीला बसलेला नाही, तर दुग्ध व्यवसायही मोठ्या संकटात सापडला आहे. शेती आणि पशुपालन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. मात्र, पावसाअभावी हिरव्या चार्याची टंचाई, पाण्याची कमतरता आणि पशुखाद्याच्या वाढत्या किमती यांमुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. दुग्धव्यवसाय हा अनेक अल्पभूधारक आणि मध्यमवर्गीय शेतकर्यांसाठी नियमित उत्पन्नाचा स्रोत आहे. शेतीतून उत्पन्न मिळाले नाही, तरी दुधाच्या विक्रीतून घरखर्च भागवता येतो. मात्र, दुष्काळामुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकर्यांना महागडे पशुखाद्य विकत घ्यावे लागत आहे. दुसरीकडे, चारा आणि पाण्याच्या अभावामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत असून दूध उत्पादनातही घट होत आहे. परिणामी, खर्च वाढत असताना उत्पन्न कमी होत असल्याने दुग्धव्यवसाय शेतकर्यांसाठी तोट्याचा ठरत आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकटाबरोबरच भावनिक प्रश्नही उभा राहतो. सरकारने दुष्काळग्रस्त भागांत चारा छावण्या सुरू करणे, पशुखाद्य अनुदान उपलब्ध करून देणे, जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करणे आणि दूध उत्पादकांना आर्थिक मदत देणे आवश्यक आहे.
श्याम ठाणेदार, दौंड, जिल्हा पुणे
ऑनलाईन सेवा घेताना सावधान!
दिवाळीची चाहूल लागली की, घरोघरी स्वच्छता मोहीम सुरू होते; परंतु आजच्या धावपळीच्या काळात आणि धकाधकीच्या जीवनात घराची स्वच्छता करण्यासाठी अनेकजण मोबाईल अॅप्स किंवा ऑनलाईन कंपन्यांची मदत घेतात. एका क्लिकवर घर बसल्या ही सेवा मिळत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर याकडे आकर्षित होत आहेत. मात्र ही ‘ऑनलाईन स्वच्छता कर्मचारी सुविधा’ वापरताना थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी ते आपल्याला मोठ्या आर्थिक त्रासाला आणि मनस्तापाला कारणीभूत ठरू शकते. नुकताच मुंबईतील मालाड येथे ऑनलाईन सेवा बुक करून घरात साफसफाईसाठी आलेल्या कर्मचार्यांनीच घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने मालाड पोलिसांनी वेगाने तपास करून चोरट्यांना अटक केली; पण या घटनेने ऑनलाईन सेवांच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अनेकदा अनेक ऑनलाईन कंपन्यांनी आपल्या घरात स्वच्छतेसाठी व इतर कामासाठी येणार्या कामगारांची पार्श्वभूमी तपासलेली नसते. यामुळे चोरी किंवा वैयक्तिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशावेळी ऑनलाईन डिजिटल सेवा सोयीच्या असल्या तरी त्या घेताना संभाव्य आर्थिक आणि मानसिक त्रासापासून स्वत:ला वाचविण्यासाठी सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे.
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
Related
Articles
८७ लाख शेतकर्यांच्या खात्यात ४,३७३ कोटी दिवाळी मदत जमा
07 Nov 2026
सीईटी परीक्षेतील कथित गैरप्रकाराबाबत पोलिसांत तक्रार
07 Nov 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलनाच्या निर्बंधांवरून गोंधळ
05 Nov 2026
ज्येष्ठ प्रकाशक, मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता यांचे निधन!
07 Nov 2026
’गोकुळ’वर कब्जा करण्यासाठी सहकार कायद्यात दुरुस्ती
05 Nov 2026
आंबट-गोड बोरांचा हंगाम सुरू
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)