किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट   

 

पूर्वसूचना देणार्‍या अ‍ॅपवर सायबर हल्ला; अनेकांचा जीव भांड्यात
 
किव्ह : युक्रेनची राजधानी किव्हमध्ये उच्च पातळीवर किरणोत्सर्ग झाला आहे. आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे, असे संदेश अनेकांच्या मोबाइल अ‍ॅपवर आले होते. मात्र ते खोटे असल्याचे आणि सायबर हल्ल्याचा हा प्रकार आहे. असे रशिया आणि युक्रेनकडून सोमवारी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला. 
 
टेलिग्रामवर रविवारी रात्री एक पोस्ट टाकण्यात आली होती. त्यामध्ये युक्रेनवर हवाई हल्ला झाला असल्याचा इशारा दिला होता. अनधिकृत गटाने अ‍ॅपच्या संचलनात हस्तक्षेप केला आणि सेवा तात्पुरती बंद केली आहे. अ‍ॅप वापरणार्‍यांनी त्याबाबतची लिंक ओपन करु नका, ती संशयास्पद सूचना आहे, असा सल्ला दिला होता. युक्रेनच्या प्राधिकरणाने सांगितले की, रशियाच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याची नागरिकांना पूर्वसूचना देण्यासाठी अ‍ॅपच वापर केला जातो. त्यावरील सायबर हल्ला झाला होता. रात्री डागडुजी करुन ते पूर्ववत सुरू केले आहे. सायबर हल्ल्यानंतर खोटे संदेश इंग्रजीत प्रसारीत केले होते. त्यामध्ये  राजधानी किव्हमध्ये उच्च पातळीवर किरणोत्सर्ग झाला आहे,  रासायनिक धोका आहे आणि सार्वजनिक जीवन विस्कळीत झाले आहे. हा संदेश इंग्रजीत लिहिला असला तरी त्यात अनेक शब्द चुकीचे होते. रशिया आणि युक्रेेनचे अनेक शब्दही त्यात होते. 
 
एका खोट्या पोस्टमध्ये हिटकोर या हॅकिंग गटाचा उल्लेेख होता. सुरक्षा सेवांशी संबंधित ’मॅश’ नावाच्या रशियन टेलिग्राम चॅनलने सांगितले की, त्यांनी हिटकोरच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांनी  हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, या दाव्याची स्वतंत्रपणे पडताळणी करता आली नाही. युक्रेनच्या सरकारी ’सेंटर फॉर काउंटरिंग डिसइन्फॉर्मेशन’ने या सायबर हल्ल्याची माहिती दिली आणि हल्ल्यावर उपाययोजना होईपर्यंत वापरकर्त्यांना समाज माध्यमावरील आपत्कालीन चॅनलवर लक्ष ठेवण्याचे आणि प्रत्यक्ष सूचना प्रणालीवर अवलंबून राहण्याचे आवाहन केले.
 
युक्रेनच्या हवाई दल कमांडचे प्रवक्ते युरी इहनात म्हणाले की, या सायबर हल्ल्याचा युक्रेनच्या सुरक्षा आणि संरक्षण कार्यावर कोणताही परिणाम झाला नाही, कारण हे अ‍ॅप लष्करी कमांड प्रणालीपासून वेगळे आहे.
 
इहनात यांनी युक्रेनच्या खाजगी ’१+१’ टेलिव्हिजनला सांगितले की, हवाई दल लोकप्रिय समाज माध्यम व्यासपीठासह स्वतंत्र संवाद माध्यमांद्वारे धोक्यांची माहिती प्रत्यक्षात  (रिअल-टाइममध्ये)  देत आहे. रशियामध्ये, अधिकार्‍यांनी सोमवारी सांगितले की, हॅकर्सनी रशियन आपत्कालीन मंत्रालयाच्या मोबाइल अ‍ॅपमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर बनावट आपत्कालीन सूचना पाठवल्या होत्या. हा हल्ला कोणी केला ? याचे नाव मंत्रालयाने जाहीर केले नाही. एका निवेदनात, रशियन नागरिकांना आश्वासन देण्यात आले की व्यापक सार्वजनिक सूचना प्रणाली सामान्यपणे कार्यरत आहे आणि एसएमएस संदेश, माध्यमांतील प्रसारण, तसेच महानगरपालिकांचे सायरन व लाऊडस्पीकरद्वारे दिल्या जाणार्‍या सूचनांसोबतच मोबाईल अ‍ॅप एक पूरक सेवा म्हणून काम करत असल्याचे सांगितले.

Related Articles