बिल्डर-अधिकार्‍यांच्या संगनमताने शहराचे वाटोळे!   

शीतल शिंदेंचा महापालिका प्रशासनावर भ्रष्टाचाराचा आरोप; १२ लाचखोर अधिकार्‍यांची चौकशी करून फौजदारी कारवाईची मागणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे शहराचे नुकसान होत असून, बांधकाम व्यावसायिक आणि अधिकार्‍यांच्या संगनमताने अनेक गैरप्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक विजय ऊर्फ शीतल शिंदे यांनी केला. आयटूआर प्रकल्पातील भूखंड वाटप, गॅलेक्सी व डॅफोडिल्स प्रकल्पांतील कथित अनधिकृत बांधकामे, लोकमान्य हॉस्पिटलमधील अनियमितता आणि नदीपात्रातील अतिक्रमणांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी शनिवारी (ता. ३१) पत्रकार परिषदेत केली.
 
गरवारे आणि प्रीमियर कंपनीच्या जागेवरील आयटूआर प्रकल्पात महापालिकेला मिळणारा मुख्य रस्त्यालगतचा दर्शनी भूखंड न देता कमी मूल्याचा भूखंड दिल्याचा आरोप शिंदे यांनी केला. यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
 
चिंचवडमधील गॅलेक्सी सोसायटीमध्ये मंजूर नकाशापेक्षा ३३६ चौरस मीटरहून अधिक अनधिकृत बांधकाम झाल्याचा दावा त्यांनी केला. डॅफोडिल्स प्रकल्पात रस्त्याची रुंदी, पार्किंग, जिने आणि अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणांचे तांत्रिक ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली.लोकमान्य हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांना सवलतीच्या सुविधा नाकारणे, कर्मचार्‍यांचे वेतन थकविणे आणि अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे आरोपही त्यांनी केले.
 
शहरातील कचरा व्यवस्थापन, बीआरटी मार्ग आणि नदीपात्रातील अतिक्रमणांबाबतही त्यांनी प्रशासनावर टीका केली. नवीन आयुक्तांच्या कार्यकाळात १२ अधिकारी लाच घेताना पकडले गेल्याचा दावा करत संबंधितांची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. प्रदूषण नियंत्रणासाठी आठवड्यातून एक दिवस बांधकामे बंद ठेवण्याची मागणीही त्यांनी केली.
 
महापालिका अधिकारी नागरिकांची कामे करण्यापेक्षा बिल्डरांकडून वसुली करण्यात अधिक व्यस्त असतात. मंजूर बांधकाम आराखडा आणि प्रत्यक्ष बांधकामात तफावत असून, अधिकारी व बिल्डरांच्या संगनमताने अनधिकृत मजले उभारले जात आहेत. आयुक्तांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.
 
- शितल शिंदे, नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Related Articles