पिंपरी : दुचाकी घसरून रस्त्यावर पडलेली तरुणी पाण्याच्या टँकरच्या चाकाखाली सापडली. यात गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. हा भीषण अपघात शनिवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास रहाटणी फाटा ते काळेवाडी फाटा दरम्यानच्या रस्त्यावर बसथांब्यासमोर घडला. सेजल प्रफुल लुटे (वय २१, रा. वर्धा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती फिजिओथेरपीचे शिक्षण घेत होती. अथर्व लवटे (मूळ रा. खारघर, नवी मुंबई, सध्या रा. पुनावळे) असे तिच्यासोबत असलेल्या तरुणाचे नाव आहे. तोदेखील शिक्षण घेत आहे. सेजल ही तिच्या ओळखीच्या अथर्वसोबत दुचाकीवरून पिंपरी येथून वाकडकडे जात होती. रहाटणी फाटा ते काळेवाडी फाटा दरम्यानच्या बसथांब्यासमोर त्यांची दुचाकी अचानक घसरली. त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले. सेजल उजव्या बाजूला पडल्याने त्याचवेळी बाजूने जाणार्या पाण्याच्या टँकरच्या मागील डाव्या चाकाखाली ती सापडली. टँकरचे चाक तिच्या पोटावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली. याबाबत माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी सेजलला सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Fans
Followers