‘जेन-झी’ आंदोलनाला जर्मनीत हिंसक वळण; दुकानांची लूट   

३४ शहरांत तरुणांची निदर्शने; पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकले  

बर्लिन : फ्रान्समधील तरुणांच्या आंदोलनानंतर आता जर्मनीतही ‘जेन-झी’  तरुणांच्या निदर्शनांना हिंसक वळण लागले आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी अधिक निधीची तरतूद करावी तसेच सक्तीची लष्करी सेवा लागू करू नये, या मागण्यांसाठी देशातील ३४ शहरांमध्ये तरुणांनी निदर्शने केली. फ्रँकफर्टमध्ये काही आंदोलकांनी दुकानांची तोडफोड आणि लूटमार केली, तर पोलिसांवर आणि आपत्कालीन सेवा कर्मचार्‍यांवर पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा आरोप आहे.
 
‘जेन झी रेगेल्ट’ या तरुणांच्या संघटनेच्या नेतृत्वाखाली बर्लिन, फ्रँकफर्ट आणि म्युनिकसह विविध शहरांत हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. बहुतांश ठिकाणी निदर्शने शांततेत पार पडल्याचे जर्मन अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र, काही ठिकाणी हिंसक घटनांमुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
 
फ्रँकफर्टमध्ये दोन दुकानांमध्ये घुसून आंदोलकांनी लूटमार केली. अनेक दुकानांच्या काचा फोडण्यात आल्या. काही अनोळखी व्यक्तींनी पोलिसांवर दगड, फटाके आणि मोलोटोव्ह कॉकटेल फेकल्याचे पोलिसांनी सांगितले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला. या प्रकरणी ३० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले. बर्लिनमध्येही २७ पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. हॅम्बर्गमध्ये काही ठिकाणी बॅरिकेड्स आणि कचर्‍याच्या डब्यांना आग लावण्यात आली. 
 
‘जेन झी रेगेल्ट’ या संघटनेने शिक्षणासाठी अधिक निधी, वाढत्या महागाईवर नियंत्रण, आरोग्य आणि मानसिक आरोग्य सेवांमध्ये सुधारणा, सामाजिक समानता आणि हवामान संरक्षण या मागण्या केल्या आहेत. जर्मनीत पुन्हा सक्तीची लष्करी सेवा लागू करण्याच्या प्रस्तावालाही तरुणांचा विरोध आहे.
 
बर्लिनमधील सभेत संघटनेच्या प्रवक्त्या लीना फ्रेडरिक यांनी शांतता आणि स्वातंत्र्याच्या बाजूने भूमिका मांडली. शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था मजबूत करणे हे आंदोलनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, आंदोलनाचे बहुतांश कार्यक्रम शांततेत पार पडले होते. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर काही शहरांत हिंसक घटना घडल्या. या हिंसाचाराशी आपला संबंध नसल्याचे सांगत ‘जेन झी रेगेल्ट’च्या आयोजकांनी त्यापासून फारकत घेतली आहे.  

युरोपात तरुणांच्या आंदोलनाची लाट

जर्मनीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्स, सर्बिया यांसारख्या देशांतील तरुणांच्या आंदोलनांचीही चर्चा सुरू झाली आहे. शिक्षण, रोजगार, महागाई, सार्वजनिक सेवा आणि सरकारी धोरणांविरोधात तरुणांकडून विविध देशांत निदर्शने केली जात आहेत.  
 

Related Articles