इस्रायलमध्ये सरकार स्थापनेसाठी आयझनकोट यांच्या चार अटी   

जेरुसलेम : इस्रायलमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे नव्या सरकारच्या स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते गादी आयझनकोट यांनी सरकार स्थापनेसाठी चार प्रमुख अटी जाहीर केल्या आहेत. या अटी मान्य करणार्‍या कोणत्याही पक्षाच्या खासदारांसाठी नव्या आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याचे दरवाजे खुले असतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
इस्रायलच्या १२० सदस्यीय संसदेला ‘नेसेट’ असे म्हणतात. सरकार स्थापन करण्यासाठी किमान ६१ सदस्यांचे समर्थन आवश्यक आहे. निवडणुकीनंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला ५३ जागा, तर आयझनकोट यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीला ४८ जागा मिळाल्या आहेत. अरब पक्षांना एकूण १९ जागा मिळाल्या आहेत. आयझनकोट यांच्या याशर पक्षाने २१ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत अरब पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. 

ज्यू आणि लोकशाहीवादी ओळख कायम ठेवावी  

इस्रायल हा ज्यू राष्ट्र असण्यासोबतच लोकशाहीवादी, उदारमतवादी आणि सर्व नागरिकांना समान अधिकार देणारा देश राहिला पाहिजे, अशी पहिली अट आयझनकोट यांनी ठेवली आहे.  

स्वातंत्र्याच्या घोषणापत्रातील मूल्यांचे पालन 

१९४८ मध्ये इस्रायलच्या स्वातंत्र्याच्या वेळी जाहीर करण्यात आलेल्या घोषणापत्रातील तत्त्वांचे पालन नव्या सरकारने करावे, अशी दुसरी अट आहे. लोकशाही, स्वातंत्र्य, न्याय आणि समानतेच्या मूल्यांवर सरकारचा कारभार आधारित असावा, असे आयझनकोट यांचे म्हणणे आहे.  
 
सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय सेवा अनिवार्य  इस्रायलमधील प्रत्येक नागरिकाने लष्करी, राष्ट्रीय किंवा नागरी सेवेत योगदान देणे अनिवार्य असावे, अशी तिसरी अट आहे. सध्या इस्रायलमध्ये बहुतांश ज्यू नागरिकांसाठी लष्करी सेवा बंधनकारक आहे. मात्र, अतिधार्मिक हरेदी ज्यू समुदायातील अनेकांना धार्मिक शिक्षणाच्या कारणास्तव लष्करी सेवेतून सूट मिळते. या सवलतीवरून देशात दीर्घकाळापासून राजकीय वाद सुरू आहे. देशाच्या सुरक्षेची जबाबदारी सर्व नागरिकांनी समानपणे उचलली पाहिजे, अशी आयझनकोट यांची भूमिका आहे.

गाझामधील हमासचे शासन संपवावे 

गाझा पट्टीतील हमासचे राजकीय शासन आणि लष्करी क्षमता संपुष्टात आणणे ही आयझनकोट यांची चौथी अट आहे. हमासला पुन्हा गाझाची सत्ता मिळू नये आणि त्याची लष्करी ताकद नष्ट केली जावी.
 

Related Articles