युद्ध कधी आणि कसे संपेल, हे आम्ही ठरवू   

खामेनी यांचा अमेरिका-इस्रायलला इशारा 

तेहरान : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर पुन्हा हल्ला केल्यास त्याला तातडीने आणि कोणत्याही भौगोलिक मर्यादेशिवाय प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी दिला आहे. तसेच, युद्ध पुन्हा सुरू झाल्यास ते कधी आणि कोणत्या अटींवर संपेल, हे इराणचे सैन्य आणि जनता ठरवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.  
 
खामेनी यांनी इराणच्या लष्कराला कोणत्याही प्रकारच्या धोक्याला तातडीने प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी तळांसह त्यांच्या इतर मालमत्तांची लक्ष्ययादी अद्ययावत करण्यास सांगितले आहे. संभाव्य संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या लष्करी सज्जतेचा आढावा घेण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. 
 
दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने आखाती देशांना ४ नोव्हेंबरपासून इराणवरील संभाव्य हल्ल्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. हा हल्ला मर्यादित कालावधीचा; मात्र तीव्र स्वरूपाचा असू शकतो, असा अधिकार्‍यांचा अंदाज आहे. अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीनंतर लष्करी कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.  
‘अमेरिकेच्या हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही’
 
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी एका मुलाखतीत अमेरिकेकडून पुन्हा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले. इराणचे सैन्य सर्व परिस्थितींना तोंड देण्यासाठी सज्ज असून, शस्त्रास्त्रांची क्षमता वाढविणे आणि संरक्षणातील त्रुटी दूर करण्यावर भर देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्याकडून आलेल्या पत्रावर इराणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी चर्चा केली आहे. अमेरिकेने संवाद सुरू करण्याचा प्रयत्न करणे ही सकारात्मक बाब असली, तरी सध्या अमेरिकी अधिकार्‍यांशी थेट बैठक घेण्याची कोणतीही योजना नाही, असे अराघची यांनी स्पष्ट केले. पुढील चर्चा थेट होणार की मध्यस्थांमार्फत, हे इराणच्या अटी पूर्ण होण्यावर अवलंबून असेल, असेही त्यांनी सांगितले. 
 
अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांचा इराणच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून आर्थिक दबाव वाढल्याचे अराघची यांनी मान्य केले. मात्र, या दबावापुढे इराण झुकणार नसल्याचे सांगत त्यांनी, ‘आम्ही आत्मसमर्पण करणार नाही,’ अशी भूमिका मांडली. 

ट्रम्प यांना हवा चर्चेतून तोडगा 

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी अटलांटा येथे झालेल्या जी-२० परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर पुन्हा हल्ला करण्याचा कोणताही अंतिम निर्णय घेतला नसल्याचे सांगितले. ट्रम्प यांना हा प्रश्न राजनैतिक चर्चेतून सोडवायचा आहे. 
 

Related Articles