श्रीलंकेच्या नौदलाकडून सात भारतीय मच्छीमारांना अटक   

कोलंबो : श्रीलंकेच्या सागरी हद्दीत अनधिकृतपणे प्रवेश करून मासेमारी केल्याच्या आरोपावरून श्रीलंकेच्या नौदलाने रविवारी सात भारतीय मच्छीमारांना अटक केली. त्यांच्यासोबत मासेमारीसाठी वापरण्यात येणारी यांत्रिक नौकाही जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले सर्व मच्छीमार तामिळनाडूतील रामेश्वरम, थंगच्चिमडम आणि पंबन परिसरातील रहिवासी आहेत.
 
तलईमन्नारच्या उत्तरेकडील समुद्रात भारतीय मासेमारी नौका मोठ्या संख्येने श्रीलंकेच्या सागरी हद्दीत प्रवेश करत असल्याचे नौदलाच्या उत्तर मध्य कमांडच्या निदर्शनास आले. त्यानंतर नौदलाने विशेष मोहीम राबवून आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषा ओलांडून श्रीलंकेच्या हद्दीत मासेमारी करणार्‍या एका भारतीय नौकेला अडविले. या नौकेतून सात मच्छीमारांना ताब्यात घेण्यात आले.
 
एस. प्लासियस (४१), एस. अलगू पांडी (२२), ए. अँटनी पिचाई (३३), जे. रबिन (२१), ए. नेल्सन (५८), आर. अरुलानंद झेवियर (६५) आणि ए. सहाय आनंद (३४) अशी या मच्छीमारांची नावे आहेत. 
 
सर्वांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी तलईमन्नारमार्गे मन्नार येथील मत्स्य व जलसंपदा विभागाच्या कार्यालयाकडे सोपविण्यात येणार असल्याचे श्रीलंकन नौदलाने स्पष्ट केले.
 

Related Articles