जळगावातील स्टेट बँक दरोडा प्रकरणी फौजदाराला अटक   

जळगाव : जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर शनिवारी दुपारी सशस्त्र दरोडा पडला. हेल्मेट आणि मास्क घालून दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी एअरगनचा धाक दाखवून बँकेतील १६ लॉकर्समधील ३५ कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १५ लाख रुपयांची रोकड लुटली. मात्र, पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून अवघ्या दोन तासांत चौघांना लुटलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. या दरोड्याचा मुख्य सूत्रधार बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक असल्याचे तपासात समोर आले आहे.
 
शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी बँकेत प्रवेश केला. चेहर्‍यावर मास्क आणि डोक्यावर हेल्मेट असल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण होते. बँकेत शिरताच त्यांनी रोखपाल आणि शाखा व्यवस्थापक जयेश राणे यांना एअरगनचा धाक दाखवला. दोघांना लॉकर कक्षात जाण्यास भाग पाडण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बँकेतील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
 
बँक कर्मचार्‍यांनी दरोडेखोरांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हवेत दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे बँकेत एकच घबराट पसरली. त्यानंतर दरोडेखोरांनी लॉकर कक्षातील १६ लॉकर्समधील सोन्याचे दागिने आणि १५ लाख रुपयांची रोकड सहा बॅगांमध्ये भरली. मुद्देमाल घेऊन चौघेही दुचाकींवरून पसार झाले.
 
दरोड्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. तालुका पोलिसांनी परिसरातील रस्त्यांवर नाकाबंदी केली. ग्रामीण भागातील पोलिस पाटलांचीही मदत घेण्यात आली. संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून विविध गावांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली. पोलिसांनी वेगाने तपास करत घटनेनंतर अवघ्या दोन तासांत चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लुटलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Related Articles