ऋतुपर्ण कुलकर्णी यांचे निधन   

पुणे : कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे संचालक ऋतुपर्ण कुलकर्णी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने रविवारी पहाटे निधन झाले. ते ५१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी अमृता, दोन मुली असा परिवार आहे. कुलकर्णी यांच्या पार्थिवावर आज (सोमवारी) वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 
कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे संस्थापक अनंतराव अंबादास कुलकर्णी यांचे ऋतुपर्ण हे नातू होत. आजोबा अनंतराव, वडील अनिरुद्ध यांच्यानंतर ऋतुपर्ण आणि त्यांच्या भगिनी देवयानी अभ्यंकर यांनी कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचा वारसा अनेक वर्षे समर्थपणे सांभाळला. मात्र, मध्यंतरी कुटुंबात मालकी हक्कावरून वाद झाल्यानंतर संस्थेचे काम थांबले. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, अमृता यांनी २०१८ मध्ये मिहाना पब्लिकेशन्सची स्थापना केली. या संस्थेतही ऋतुपर्ण कार्यरत होते.
 
ऋतुपर्ण हे रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीचे सदस्य होते. ‘रोटरी माझे, शहर माझे वचन’ आणि जय गणेश व्यासपीठ आयोजित ‘अनुकरणीय गणेशोत्सव पारितोषिक वितरण’ या कार्यक्रमाच्या आयोजनात त्यांचा सहभाग होता. हा कार्यक्रम रविवारी सकाळी नियोजित होता. त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.

Related Articles