शहरातील अनेक भागांत पावसाच्या सरी   

पुणे : शनिवार आणि रविवार या सलग दोन दिवसांत पुणे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या, तर हिंजवडी परिसरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला. अचानक आलेल्या पावसामुळे वाहनचालक, पादचारी आणि कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. विशेष म्हणजे शहरातील काही भागांत पाऊस पडत असताना अन्य भागांत मात्र ढगाळ वातावरण किंवा कोरडे हवामान असे संमिश्र चित्र पाहायला मिळाले.
 
धायरी, आंबेगाव, सिंहगड रस्ता, सुसगाव, बावधन, पाषाण, बाणेर, सुस रोड आणि वारजे परिसरात पावसाने हजेरी लावली. काही भागांत पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर अधिक होता. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले. रविवारी हिंजवडी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. 
 
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. भोर आणि शिरूर येथे झालेल्या तुलनेने अधिक पावसामुळे शेतीच्या कामांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामाची तयारी सुरू असताना झालेला हा पाऊस काही भागांत जमिनीतील ओलावा वाढविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. मात्र, काढणीला आलेली पिके किंवा उघड्यावर ठेवलेले शेतीमाल यांना पावसाचा फटका बसण्याची आहे.
 
दरम्यान, हवामान विभागाच्या  अंदाजानुसार पुढील तीन दिवस पुण्यात मुख्यतः निरभ्र ते अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता देखील आहे. 
 
शहरातील काही भागांत मुसळधार, तर काही ठिकाणी हलक्या सरी असे चित्र असल्याने पुणेकरांना एकाच वेळी वेगवेगळ्या हवामानाचा अनुभव येत आहे. 
अचानक बदलणार्‍या हवामानामुळे नागरिकांचे दैनंदिन नियोजन विस्कळीत झाले असून, आगामी काळात हवामानात आणखी कोणते बदल होतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
 

Related Articles