दिवाळीच्या खरेदीसाठी पुणेकरांची झुंबड!   

मध्यवस्तीत वाहतूक कोंडीचा फटका 

पुणे : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने तसेच सुट्टीच्या दिवसाचे औचित्य साधून पुणेकरांनी रविवारी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती. मात्र, या खरेदीच्या उत्साहाचा फटका शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेला बसला असून, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता यांसह प्रमुख मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनचालकांना कोंडीत अडकून पडावे लागले. एकीकडे बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची अक्षरशः दमछाक होत असल्याचे चित्र रविवारी देखील पाहायला मिळाले.
 
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. कपडे, दागिने, आकाशकंदील, पणत्या, सजावटीचे साहित्य, मिठाई आणि फराळाचे पदार्थ खरेदी करण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने मध्यवस्तीतील बाजारपेठांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग मंदावून अनेक ठिकाणी वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला.
 
फडके हौद ते लाल महाल चौक तसेच क्वार्टर गेट चौक ते टिळक चौक या संपूर्ण लक्ष्मी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्त्यावरही वाहनचालकांना संथ गतीने मार्गक्रमण करावे लागत होते. विशेषतः बाजारपेठांमधील दुकानांसमोर खरेदीसाठी थांबणार्‍या नागरिकांमुळे वाहतुकीचा वेग आणखी मंदावला. याशिवाय फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि टिळक रस्त्यावरही वाहनांची गर्दी वाढल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

खरेदीचा आनंद की वाहतूक कोंडीचा मनस्ताप?

दिवाळीच्या खरेदीसाठी कुटुंबीयांसह बाजारपेठांमध्ये येणार्‍या नागरिकांना वाहन पार्किंगसाठी जागा शोधताना मोठी कसरत करावी लागत आहे. दुकानांसमोर होणारी गर्दी, रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग आणि वाहतुकीचे विस्कळीत नियोजन यामुळे नागरिकांना अपेक्षित वेळेपेक्षा अधिक वेळ प्रवासात घालवावा लागत आहे. पादचार्‍यांनाही रस्त्यावरून चालताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही मार्ग काढणे कठीण होण्याची शक्यता आहे.

गर्दीच्या वेळेत वाहतूक नियोजनाची गरज 

दिवाळीच्या निमित्ताने पुढील काही दिवस मध्यवर्ती बाजारपेठांमधील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि इतर प्रमुख बाजारपेठांच्या परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्याची गरज आहे. नो-पार्किंग आणि नो-एंट्रीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, दुहेरी पार्किंगला आळा घालावा आणि गर्दीच्या वेळेत वाहतुकीचे प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दुहेरी पार्किंग, नो-एंट्रीचे नियम धाब्यावर!

वाहतूक कोंडीला केवळ वाहनांची वाढलेली संख्या जबाबदार नसून, नियमांचे सर्रास उल्लंघनही त्यात भर घालत असल्याचे दिसून आले. अनेक वाहनचालकांकडून रस्त्याच्या कडेला दुहेरी पार्किंग केले जात आहे. नो-पार्किंग क्षेत्रातही वाहने बिनदिक्कत उभी केली जात असल्याने रस्त्यावरील वाहतुकीसाठी उपलब्ध असलेली जागा आणखी कमी होत आहे. काही ठिकाणी नो-एंट्रीचे नियम धाब्यावर बसवून वाहनचालक प्रवेश करत असल्याने समोरासमोर वाहने अडकण्याचे प्रकार घडत आहेत. परिणामी, एका ठिकाणी निर्माण झालेल्या कोंडीचा परिणाम आसपासच्या रस्त्यांवरील वाहतुकीवरही होत आहे.

Related Articles