ऊसाचा दर जाहीर करा, अन्यथा आंदोलन करणार : राजू शेट्टी   

सोलापूर, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी लाखो टन उसाचे गाळप करूनही अद्याप उसाचा पहिला हप्ता आणि दर जाहीर न केल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शेतकर्‍यांच्या घामाला योग्य दाम देण्याऐवजी दराचा निर्णय प्रलंबित ठेवून गाळप सुरू ठेवणार्‍या कारखानदारांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘ऊसाचा दर जाहीर करा, अन्यथा सोलापुरात येऊन शेतकर्‍यांसह तीव्र आंदोलन छेडू,’ असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
 
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधताना राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला. या संवादाची माहिती सोशल मीडियावर समोर आली आहे. शेतकर्‍यांच्या उसाचा दर निश्चित न करता लाखो टन ऊसाचे गाळप करणे म्हणजे शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक करण्यासारखे आहे. स्वतःच्या कष्टाने पिकविलेल्या उसाला किती दर मिळणार, हे जाणून घेण्याचा प्रत्येक शेतकर्‍याला अधिकार आहे. मात्र, कारखानदारांकडून या अधिकाराकडेच दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.
 
साखर कारखानदारांना गाळपाची एवढीच घाई असेल, तर त्यांनी सर्वप्रथम उसाचा दर जाहीर करावा. जाहीर केलेला दर शेतकर्‍यांना मान्य असेल, तर ते स्वतःहून ऊस गाळपासाठी देतील. मात्र, दराचा निर्णय न घेता शेतकर्‍यांवर दबाव टाकून ऊस घेण्याचा प्रयत्न करणे ही सरळसरळ दादागिरी असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. 
 
इतर जिल्ह्यांतील साखर कारखानदार उसाला दर देण्याची तयारी दर्शवत असताना सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार मात्र दर जाहीर करण्याबाबत टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

Related Articles