जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत जयकुमार गोरेंचे पॅनल सज्ज   

मोहिते-पाटील कोणासोबत जाणार?

सोलापूर, (प्रतिनिधी) : आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात आता मोठे राजकीय वारे वाहू लागले आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे स्वतंत्र पॅनल असणार, यावर शनिवारी अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे बँकेच्या सत्तासंघर्षातील चुरस आता आणखी वाढली आहे. एकीकडे भाजपने पूर्ण ताकदीनिशी कंबर कसली असतानाच, दुसरीकडे बँकेचे माजी अध्यक्ष रणजितसिंह मोहिते-पाटील यांनीही पालकमंत्री  गोरे यांच्या विरोधात मैदानात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.
 
गेल्या काही काळापासून भाजपच्या महत्त्वाच्या बैठकांपासून काहीसे अलिप्त राहिलेले आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख या दोन नेत्यांची नेमकी काय भूमिका असेल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. या अटीतटीच्या निवडणुकीत रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासोबत नक्की कोणकोणते नेते असणार आणि ते कोणाला आपल्याकडे खेचणार, हा सध्या राजकीय वर्तुळातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे.
 
सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळात एकूण १९ जागा आहेत. त्यापैकी ११ संचालक हे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून निवडले जातात. प्राप्त माहितीनुसार, भाजपने या ११ जागांवरील उमेदवारांची नावे जवळपास निश्चित केली आहेत. माळशिरस तालुका वगळता उर्वरित १० सोसायट्यांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यात सध्या तरी भाजपला अनुकूल स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.
  
या प्रमुख जागांव्यतिरिक्त उर्वरित आठ मतदारसंघांमध्ये दोन महिला प्रतिनिधी, एक इतर मागास प्रवर्ग, एक भटक्या जाती जमाती, एक अनुसूचित जाती व जमाती, तसेच दुग्ध संस्था, पणन व कृषी प्रक्रिया आणि नागरी बँका व पतसंस्था यांचा समावेश आहे. या जागांच्या उमेदवारांचा आणि जागावाटपाचा अंतिम निर्णय अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी घेतला जाईल, अशी रणनीती भाजप नेत्यांनी आखली आहे. या वाटपानंतरच बँकेचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार, याचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे.
 
या संपूर्ण राजकीय मोर्चेबांधणीमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार राजेंद्र राऊत यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दुग्ध संस्था, पणन व कृषी प्रक्रिया मतदारसंघ आणि नागरी बँका व पतसंस्था या मतदारसंघांमध्ये आपल्या मतदारांची पक्की मोट बांधली आहे. त्यामुळे आगामी उमेदवारी वाटपात कोणत्या आमदाराचे पारडे जड राहील आणि कोणाचा वरचष्मा दिसेल, हे पाहणे अतिशय औत्सुक्याचे ठरणार आहे. 
 
गेल्या काही काळातील राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास, भाजप आणि मोहिते-पाटील गट यांच्यात लोकसभा २०२४, त्यापाठोपाठ विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि विधान परिषद अशा सलग पाच निवडणुकांमध्ये उघड संघर्ष पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, यापैकी लोकसभा २०२४ व विधानसभा निवडणुकांमध्ये मोहिते-पाटील गट जास्त प्रभावी आणि सरस ठरला होता. आता या बँकेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
 
जिल्हा बँकेची सत्ता ही ग्रामीण भागातील अर्थकारण आणि राजकारणाची मुख्य नाडी मानली जाते. त्यामुळे भाजप आणि मोहिते-पाटील गट यांच्यातील ही लढत आता प्रतिष्ठेची झाली आहे. देशमुख गटाची सद्यस्थितीतील अलिप्तता आणि स्थानिक आमदारांची मजबूत मोर्चेबांधणी पाहता, उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशीच खर्‍या अर्थाने राजकीय चित्र स्पष्ट होईल. हा संघर्ष निश्चितच जिल्ह्याच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणारा असणार आहे.
 

Related Articles