नियम आणले का? (अग्रलेख)   

नागरिकांचा ’खासगीपणाचा हक्क‘ मूलभूत असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये दिला. कोणाचीही वैयक्तिक माहिती उघड होऊ नये हे योग्यच आहे; पण भ्रष्टाचार, गैरवर्तनही उघड करायचे नाही, असा त्याचा अर्थ नाही.
 
जनतेच्या हिताची एखादी बातमी प्रसिद्ध करायची असेल, तर त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल का? जर सरकारने परवानगी नाकारली, तर ती बातमी/मजकूर रद्द करायचा का? डिजिटल माहिती संरक्षण कायद्याला जोडून सरकार आणू पाहात असलेल्या नियमांमुळे हे प्रश्न उभे राहिले आहेत. ’डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा’ २०२३ चा आहे. त्याला अनुषंगून केंद्राने गेल्या वर्षी नियम बनवले, ते पुढील वर्षी अमलात आणण्याचा केंद्राचा विचार आहे. त्याला वृत्त क्षेत्रातील २१ संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हा कायदा व नियम वृत्तपत्र स्वातंत्र्य संकुचित करणारे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या कायद्यातील व नियमातील काही तरतुदी पत्रकार व माध्यमे यांच्या मूलभूत कार्यावर गदा आणत आहेत, असे अर्जकर्त्यांनी म्हटले आहे. त्यात तथ्य आहे हे नाकारता येणार नाही. कोणती माहिती उघड केल्याने या कायद्याचा भंग होईल हे स्पष्ट नाही. ते ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारच्या संबंधित खात्याकडे असेल का? या नियमांच्या हेतूविषयी त्यामुळे शंका निर्माण होते. हे नियम पत्रकार व माध्यमे यांच्यासाठी नाहीत, माहिती जमा करून ती वापरणार्‍या संस्था, उदाहरणार्थ बँका, दूर संचार कंपन्या यांच्यासाठी असल्याचे सरकार सांगत आहे; पण हा दुबळा बचाव आहे.

पत्रकारितेवर आघात?

बातमी प्रसिद्ध करणे आणि शोध पत्रकारिता यांना या कायद्यातून वगळलेले नाही, ही या कायद्यातील मोठी उणीव आहे. कोणती माहिती का संरक्षित ठेवायची याचा उलगडा त्यामुळे होत नाही. भ्रष्टाचार आणि सार्वजनिक क्षेत्रातील गैरवर्तन याबाबत माहिती जमा करून वृत्त प्रसिद्ध करणे हा शोध पत्रकारितेचा (इन्व्हिस्टिगेटिव जर्नालिजम)  भाग आहे. मात्र ते वृत्त प्रसिद्ध करण्यापूर्वी संबंधितांना त्याची माहिती देण्याची व त्यांची ’मान्यता’ घेण्याची अट या कायद्यात आहे, ती नक्कीच जाचक आहे. असे केल्यास त्या व्यक्ती पुरावा नष्ट करू शकतील तसेच साक्षीदारांना/माहिती पुरवणार्‍यांना धमकी देऊ शकतील. या कायद्यातील दोन कलमांनुसार त्या व्यक्ती मान्यता मागे घेऊ शकतात, तसेच मजकूर पुसून टाकण्याची (इरेझर) मागणी करू शकतात. जरी ती बातमी/मजकूर जनहिताचा असला तरी माध्यमाने ऑनलाईन किंवा मुद्रित स्वरूपात प्रसिद्ध केलेला मजकूर काढून घेण्याची माध्यमावर सक्ती होऊ शकते. वार्तांकन व शोध पत्रकारिता यांच्यावर तो आघात ठरेल यात शंका नाही. गेल्या मार्च ते जुलै या काळात समाज माध्यमांवरील १ लाख ९५ हजार मजकूर ’अडवण्याचे’ किंवा ’रद्द करण्याचे’ ’आदेश’ केंद्राने दिल्याचे अलीकडेच प्रसिद्ध झाले होते. दिल्लीतील ’सीजेपी’च्या आंदोलनाच्या काळात हे आदेश जास्त प्रमाणात दिले गेले. शेतकरी आंदोलनाच्या काळातही असे  आदेश मोठ्या प्रमाणावर दिले गेले होते. बातमी/पोस्ट आपल्या विरोधात असल्याचा ’संशय’ जरी आला तरी केंद्र सरकार तो हटवण्याचे आदेश देते हे अनेकदा दिसले आहे. त्या पार्श्वभूमीवर या कायद्यातील संबंधित कलमे जास्त चिंताजनक आहेत. माहिती आणि ती ज्या कागदपत्रांवर आधारित आहे, ती मागून घेण्याचे अमर्याद अधिकार या कायद्याने माहिती संरक्षण मंडळास मिळतील. भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार यांची माहिती माध्यमांना देणारी व्यक्ती ही माध्यमांचे ’स्रोत’(सोर्स) असतात. ते गुप्त असतात; पण या तरतुदीमुळे ते उघड करावे लागतील. जनहिताच्या बातम्या देणे यामुळे अवघड बनेल. शिवाय त्या व्यक्तीस (व्हिसलब्लोअर) धोका उत्पन्न होऊ शकेल. सत्तेतील किंवा सत्ताधार्‍यांच्या वर्तुळातील व्यक्ती जर गैरव्यवहारात गुंतली असेल, तर तिच्या विरोधात काहीही बोलणे/लिहिणे या कायद्याने अशक्य बनेल. या तरतुदींचे पालन न केल्यास २५० कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्याची तरतूद या कायद्यात आहे. बँका किंवा दूरसंचार कंपन्या अकारण व्यक्तीची माहिती उघड करणार नाहीत; म्हणजे उरली माध्यमे. जनहिताच्या दृष्टीने त्यांनी कोणावर टीका करायची नाही का? जर माध्यमांना हे नियम लागू होणार नसतील, तर मुळात ते आणले कशाला?
 

Related Articles