E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
संपादकीय
राम लक्ष्मणाने स्वीकारले शरबंधन
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
भावार्थ रामायणातील कथा : विलास सूर्यकांत अत्रे
मो. नं. ९८५०९७८४५०
अतिकाय याचा लक्ष्मणाच्या हातून उद्धार झाला. अतिकाय पडताच वानर सैन्यात आनंदाचे वारे वाहू लागले. लक्ष्मणाला जवळ घेत रामाने त्याच्या मस्तकाचे अवग्रहण केले. त्याची पाठ थोपटून त्याचा गौरव केला. लक्ष्मणाचा जयजयकार वानरांनीच नाही, तर स्वर्गात सुरवरांनीही केला. रावणाच्या कानावर आपल्या या महारथी पुत्राच्या मृत्यूची बातमी आली आणि तो मुळापासून हादरला. आमची सगळी वर्मे बिभीषणाला माहीत आहेत. तो रामाला फितूर झाला आहे. त्याच्या सांगण्यामुळे लक्ष्मणाने अतिकाय याच्यावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला असणार. आमच्या कुळाचा तोच सर्वनाश करणार आहे’.
पण बिभीषणाचा विचार करून आता चालणार नव्हते. रावण उद्विग्न झाला. त्याचा कंठ दाटून आला. रावणाची अवस्था पाहून इंद्रजीत त्याला सामोरा आला. रावणापुढे जात तो म्हणाला, ’पिताश्री हा इंद्रजीत इथे जिवंत असताना तुम्हाला अश्रू ढाळायचे काहीही कारण नाही. रणांगणात जाऊन मी हलकल्लोळ उडवून देईन. माझे निर्वाण बाण राम आणि लक्ष्मणाचे प्राण हरण करून येतील. बाकी माकडसेना तर माझ्या खिजगणतीतही नाहीत’. एवढे बोलून इंद्रजीताने रावणाकडे युद्धावर जाण्याची आज्ञा मागितली. इंद्रजीताचा आवेश पाहून रावणाला धीर आला. त्याने इंद्रजीताला यशस्वी भव असे आशीर्वाद दिले’.
पित्याच्या आशीर्वादाचा स्वीकार करीत त्याच्या आज्ञेप्रमाणे इंद्रजीताने आपला रथ सिद्ध केला. सोबत असंख्य सैन्य घेतले. तरीही राम आणि लक्ष्मणाचा पराक्रम पाहून तो मनातून धास्तावला होता. राम आणि लक्ष्मण यांना रणांगणात समोरासमोर जाऊन जिंकणे शक्य नसल्याची त्याची खात्री झाली होती. सुरासुरांनाही जारणमारण विद्येचा वापर करूनच इंद्रजीताने जिंकले होते. तसाच काही जारणमारण विद्येचा वापर केला, तरच राम आणि लक्ष्मणाला जिंकता येईल, असे त्याला खात्रीशीर वाटत होते. त्यासाठी त्याने अभिचार यज्ञ करण्याचे ठरविले.
हा यज्ञ करण्यासाठी इंद्रजीत निकुंबळ या गावात आला. हा यज्ञ करण्यासाठी निकुंबळेत गेलो आहोत ही माहिती बिभीषण रामाला देईल, अशी भीती इंद्रजीताला वाटत होती. तसे काही झाले, तर वानरांच्या धाडीवर धाडी येतील आणि आपले इप्सित साध्य होणार नाही, हे इंद्रजीताला मनोमन कळून चुकले होते. म्हणून इंद्रजीताने निकुंबळेपाशी येताच दारोदारी राक्षसांचा पहारा बसविला. मनोभावे केलेल्या पूजेमुळे यज्ञभोक्ता अग्नी प्रसन्न झाला आणि त्याने इंद्रजीताला ब्रह्मवरदान दिले. इंद्रजीताला मंत्र, अस्त्र आणि ब्रह्मास्त्र प्राप्त झाले. त्यांच्याच मंत्रोदकाने अभिमंत्रित केलेले रथ, खड्ग, धनुष्यबाण त्याला प्राप्त झाले. तसेच रथाचे अश्व, सारथी हेही प्राप्त झाले. तो रथ भूमीवर तसेच आकाशातूनही गमन करणार होता. या वरदानामुळे लाभलेला रथ, त्याचे अश्व, त्याचा सारथी आणि त्यात आरूढ होणारा रथी म्हणजेच इंद्रजीत सारेच अदृष्य राहाणार. ते कुणालाच दिसणार नव्हते.
इंद्रजीत या अशा अदृष्यपणे जाणार्या रथात स्वार झाला. रणांगणाकडे येताच त्याने बाणांचा वर्षाव सुरू केला. बाण येत होते, दाही दिशातून कुठूनही कसेही येत होते. सारे आकाश बाणांनी भरून गेले. बाणांचा वर्षाव करणारा धनुर्धारी कुणालाच दिसत नव्हता. समोर योद्धा कोणीच दिसत नसल्यामुळे, रणभूमीवर सगळे खिळून गेले होते. त्याच्या हल्ल्यामुळे सुग्रीव, हनुमान, अंगद, नळ, नीळ, जाबंवंत आणि इतर बेशुद्ध होऊन पडले. इंद्रजीताला संपूर्ण युद्धच आपण जिंकले असल्यासारखा आनंद झाला. राहता राहिले राम आणि लक्ष्मण. त्यांचा घात केला, की युद्ध संपलेच अशा गुर्मीत त्याने राम लक्ष्मणावर शर संधान करण्यास सुरुवात केली.
संकट निवारणाचा मार्ग
अंगावर आदळणारे बाण पाहून राम हसून लक्ष्मणाला म्हणाला, ’यज्ञ करून जारणमारणाची क्रिया करून इंद्रजीताने ब्रह्मवरदाचे हे वरद बाण तसेच ब्रह्मास्त्र मिळविले आहे. या पूर्वीही इंद्रजीताने आपल्याला शरपंजरी बंधक करण्यासाठी वरदबाणांचा मारा केला होता. जारणमारण विद्या म्हणजे माया. या मायेने आपण बांधले जाणार नाही. उलट आपल्यावर या मायेचा प्रयोग केल्यानंतर या शरपाशाला कोणीही सामोरा येऊ शकत नाही. कोणताही निशाचर अगदी इंद्रजीत असो, की दशानन तो आपल्या सन्मुख आल्यास त्यांचा मी माझ्या बाणांनी शिरच्छेद करीन. तरीही हे ब्रह्मवरद शर आहेत. ब्रह्मदेवाच्या शब्दांचा मान राखला पाहिजे. इंद्रजीताचे बाण निवारण्यासाठी या वरदबाणांना, ब्रह्मास्त्राला जमिनीवर आडवे होत शरण जाणे आणि आपणही शरबंधनी बंधक होणे हाच या संकटाचे निवारण करण्याचा मार्ग आहे. रामाचे शब्द ऐकताच लक्ष्मणाने शरबंधन स्वीकारले, पाठोपाठ रामही शरबंधनात बंदिस्त झाला. त्या दोघांना मूर्च्छित झालेले आणि त्यांच्या डाव्या हातात विसावलेले धनुष्य पाहून इंद्रजीताला परमानंद झाला; पण जीवाच्या भीतीने राम लक्ष्मण यांना सामोरे जाण्याचे इंद्रजीताने टाळले.
इंद्रजीताच्या पराक्रमाने राक्षस सैन्यात रणवाद्यांचा दणदणाट सुरू झाला. त्यापुढे निशाचर गाऊ, नाचू लागले. त्या आवाजाने, त्यांच्या नाचण्या ओरडण्याने अवघे आकाश व्यापून गेले. समस्त शत्रूंना शरबंधनात बंदिस्त करून इंद्रजीताने उन्मादात लंकेत प्रवेश केला. तो रावणाला सामोरा जात म्हणाला, ’रामलक्ष्मणासह सगळ्यांनाच मी शरबंधनात जखडून टाकले आहे. या शरबंधनामुळे कोणाचेही धैर्य, शौर्य, सामर्थ्य, पौरुषत्व सारे काही क्षीण होत होत नष्ट होते. शरबंधाचे अजून एक लक्षण म्हणजे सकाळी सकाळी प्रथम सूर्यकिरणांचा त्याला स्पर्श होताच बंधनात जखडलेल्याचा प्राण जातो. शरबंधन हे असे प्राण हारक आहे. आता सारेच शरबंधनाचे बंधक झाले आहेत. पिताश्री तुम्ही आता निर्भय झाला आहात. जय लंकेश’.
ब्रह्मवचन पाळण्यासाठी राम आणि ल्क्ष्मण यांनी शरबंधन स्वीकारले. शरबंधनात वानरांचाही जीव जायचा, पण रामस्मरणाने ते फक्त बंदिस्त झाले होते. शरबंधन केल्यानंतर त्या बंधनाला इंद्रजीत किंवा कोणीही निशाचर सामोरे जाऊ शकत नव्हते. तसे केले असते तर शरबंधनाला सामोरे जाणार्याचाच मृत्यू झाला असता. आता फक्त सकाळ होण्याची वाट पहाणे एवढेच इंद्रजीताकडे शिल्लक उरले होते.
सुग्रीव शरपाशात
बिभीषण शरबंधनात बंदिस्त झाला नव्हता, रणवाद्यांचे तसेच शस्त्रात्रांचे आवाज बंद झाले. कुणाचे रडणे ओरडणे ऐकू येत नव्हते, काय झाले आहे म्हणून पाहाण्यास बिभीषण आला असता, त्याला राम लक्ष्मणासह सारी वानरसेनाच शरबंधनात बंदिस्त असल्याचे दिसले. निशाचरांचे कपट नाट्य त्याने ओळखले. त्याच्या लक्षात आले की, राम आणि लक्ष्मणाने ब्रह्मवचनाचा आदर राखला आहे. बाह्यात्कारी दिसत नसले तरी खरेतर ते सावधच आहेत; पण बाकी सर्वांना सावध कसे करायचे? तो अतिशय काळजीत पडला. कपीराज सुग्रीव हा मुख्य सेनानी असल्यामुळे जिथे तो पाशबद्ध होऊन पडला होता, तिथे बिभीषण गेला. बिभीषणाच्या बाजूलाच हनुमान होता; पण बिभीषणाच्या ते लक्षात आले नाही. सुग्रीवाला सावध करण्याचा बिभीषण प्रयत्न करू लागला, तो सुग्रीवाला म्हणाला, ’सुग्रीवा, हे वानरांच्या राजा, सावध हो. या शरपाशातून मुक्त हो. राम लक्ष्मणाची काळजी करू नकोस. ब्रह्मवचनांचा आदर करण्यासाठी त्यांनी स्वत:ला बंदिस्त केले आहे. ते दोघे आणि अंजनीसूत हनुमान यांना हे शरबंधन बंदिस्त करण्यास पूर्ण असमर्थ आहे’. हनुमानाचे नाव घेताच बिभीषणाच्या पुढ्यात हनुमान येऊन उभा राहिला. त्याने हसत हसत बिभीषणाला विचारले, ’मला शरपंजर बंदिस्त करू शकत नाही हे तुला कसे माहिती आहे?’
त्यावर बिभीषण हनुमानाला म्हणाला, ’अशोकवनात याच ब्रह्मास्त्राने तुला बांधण्याचा प्रयत्न केला होता. तो वाया गेलेला मी पाहिला होता. तुला ब्रह्मास्त्राची बाधा होऊ शकत नाही हे मला समजले आहे. पण ते जाऊ दे आता आपण वेळ न दवडता कितीजण बंदिस्त झाले आहेत त्यांचा शोध घेऊ आणि त्या पेक्षाही या पाशातून मुक्ती मिळविण्याचा काही मार्ग शोधला पाहिजे. मला वाटते वयोवृद्ध अनुभवी असलेला जांबवंत असा मार्ग सांगू शकेल, म्हणून आधी आपण जांबवंताचा शोध घेऊ’ बिभीषणाच्या म्हणण्याप्रमाणे ते दोघे जांबवंताला शोधू लागले. शोध घेता घेता सर्वांगावर जखमा झालेला, वेदनांनी गुंगीत असलेला, तरीही रामस्मरणात दंग असलेला जांबवंत त्यांना दिसला. बिभीषण त्याच्याशी बोलू लागलाच अतिशय प्रयासाने तो म्हणाला, ’बिभीषणा तुझा आवाज मी ओळखला. हनुमंत कुठे दिसतो आहे का ते पाहा, तो कसा आहे ते मला सांग’.
जांबवंत इतर सर्व सोडून फक्त हनुमानाची चौकशी का करीत आहे, हे बिभीषणाला समजले नाही. न राहून बिभीषणाने जांबवंताला विचारले ’अरे जांबवंता, ज्यांच्यासाठी तुम्ही लंकेत आला आहात ते राम, लक्ष्मण, तुमचा वानरराज सुग्रीव, किंवा युवराज अंगद अगदी किमान तुझा भाऊ धूम्र या कुणाचीही चौकशी न करता तू हनुमानाची का चौकशी करीत आहेस’ त्यावर जांबवंत त्याला म्हणाला की, ’त्या सगळ्यांच्याच काळजीमुळेच मी हनुमानाची चौकशी करीत आहे. एक हनुमान जिवंत असला आणि अवघे वानर मेले, तरी वानरांचाच जय होईल. आणि अवघे वानर जिवंत असतील आणि एक हनुमान नसेल तर आम्ही जिवंत असून आमचा पराजय होईल. आम्ही सगळेच बंदिस्त झालो आहोत. हनुमानच आम्हा सगळ्यांना या शरबंधनातून मुक्त करू शकेल म्हणून मी हनुमानाची चौकशी करीत आहे.’
जांबवंताचे शब्द कानी पडताच योग्य व्यक्तीला योग्य व्यक्तीपाशी योग्यवेळी आणल्याचा आनंद बिभीषणाला झाला. तो जांबवंताला म्हणाला, ’हनुमान वज्रदेही आहे. त्याच्या देहाला बाण विंधू शकत नाहीत. त्याला कुठले आले आहे शरबंधन? हे अस्वलांच्या राजा या कठीण प्रसंगी तूच काहीतरी मार्ग सांगशील या खात्रीने तुझा शोध घेत तोही इथे माझ्या बरोबर आला आहे’. हनुमानाने जांबवंताला नमस्कार केला. दोघांनी एकमेकाला आलिंगन दिले. जांबवंत त्याला म्हणाला, ’हनुमाना तू आलास, तुझ्यामुळे आम्हा सर्वांचा पूनर्जन्मच होणार आहे. तू सर्व शक्तिमान आहेस. मी सांगतो ती दिव्यौषधी तूच आणू शकशील आणि ती ही वेळेत. सकाळचे सूर्यकिरण कुणाच्याही अंगावर पडायच्या आत राम लक्ष्मणासह सर्वांना तुला बंधमुक्त करायचे आहे. नाहीतर ही शक्ती आम्हा सर्वांचे प्राण हरण करील. समुद्रलंघून अतीउत्तरेकडे गेल्यानंतर हिमालय नावाच्या पर्वतांच्या रांगा आहेत. त्यात द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे. या द्रोणागिरीच्या एका भागात या दिव्यौषधीं आहेत. त्यावरून वाहात येणार्या नुसत्या वार्यामुळे मेलेल्याला जीवदान देणारी अमृतसंजीवनी तिथे आहे, हृदयाचे शल्य निवारणारी विशल्यकरणी आहे. तुटलेली हाडे जुळवून देणारी संघिनी आहे नुसत्या जखमाच काय तर त्यांचे व्रणही नष्ट करणारी सुवर्णकारीणी आहे. अशा अनेक दिव्यौषधी तिथे स्वयंप्रकाशाने लखलखताना दिसतील. हनुमाना त्या सगळ्या दिव्यौषधी तुला सूर्योदयापूर्वी आणायच्या आहेत’. जांबवंताचे बोलणे ऐकताच हनुमानाला प्रचंड स्फुरण आले. त्याचे बाहू फुरूफुरू लागले. आणि ’जय श्री राम’ म्हणून रामाच्या नावे गगनभेदी आरोळी देत त्याने उत्तरेच्या दिशेने झेप घेतली.
(आधार : संत एकनाथकृत भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय ३२ ते ३५)
Related
Articles
’गोकुळ’वर कब्जा करण्यासाठी सहकार कायद्यात दुरुस्ती
05 Nov 2026
सेन्सेक्स २ हजार अंकांनी वधारला
06 Nov 2026
भोसरी-दिघी रस्त्यावरील धोकादायक विद्युत टॉवर तातडीने हटवा
04 Nov 2026
निर्देशांकात काहीशी वाढ
09 Nov 2026
यूँ ही चला चल राही
06 Nov 2026
प्रवाशाच्या बेजबाबदार कृत्याने विमानातील प्रवाशांचा जीव धोक्यात
04 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित