ज्ञानेश कुमारांविरोधात देशद्रोहाचा खटला चालवा   

‘इंडिया’ आघाडीचा जन महाभियोगात प्रस्ताव

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तातडीने हटविण्यात यावे, या मागणीचा पुनरुच्चार करत ‘इंडिया’ आघाडीने शनिवारी ‘अभिरूप संसदे’त ‘जन महाभियोग’ कार्यक्रम घेतला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका चोरण्यासाठी कारस्थान आखले, असा आरोप केला. या कारस्थानात ज्ञानेश कुमार सहभागी झाले; त्यामुळे त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवला गेला पाहिजे, असा प्रस्ताव वाचून दाखवला.
 
मतदार यादी विशेष तीव्र पडताळणी (एसआयआर) मोहीम रद्द करण्यात यावी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना तातडीने हटविण्यात यावे, या मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली  आहे. विविध प्रकारच्या आंदोलनानंतर काल खर्गे यांच्या निवासस्थानी ‘अभिरूप संसद’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘जन महाभियोग’ कार्यक्रम घेण्यात आला. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मीरा कुमार यांनी सभापती म्हणून कामकाज पाहिले. तर, समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी उपसभापती म्हणून काम पाहिले.
 
या ‘अभिरूप संसद’त खर्गे यांसह काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, जयराम रमेश, सी. वेणुगोपाल आदी उपस्थित होते. या व्यतिरिक्त विरोधी आघाडीतील विविध घटक पक्षांचे अनेक खासदार आणि नेते उपस्थित होते. यामध्ये समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव आणि तृणमूल काँग्रेसच्या संसदीय पक्षाचे नेते डेरेक ओ’ब्रायन यांचा समावेश होता.

Related Articles