देश तोडण्यासाठी परदेशात गुप्‍त बैठका   

विरोधकांनी कारस्थान रचल्याचा पंतप्रधानांचा आरोप

एकता नगर, (गुजरात) : निवडणुकांमधील सततच्या पराभवांमुळे विरोधकांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. या हताशेतून ते देशाच्या विकासात अडथळे निर्माण करण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. तसेच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या परदेश दौर्‍यांचा अप्रत्यक्ष संदर्भ देत देशात फूट पाडण्यासाठी विरोधकांकडून परदेशात गुप्त कारस्थाने रचण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत, असा दावाही केला.सरदार वल्‍लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त आयोजित ’राष्ट्रीय एकता दिवस’ कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काल सार्वजनिक महाभियोग सभा विरोधी पक्षांनी आयोजित केली होती. तसेच, आज (रविवारी) रामलीला मैदानावर महासभा होणार आहे. त्यापूर्वी, मोदी यांनी विरोधकांना लक्ष्य केले
 
मोदी म्हणाले, ते आता केवळ ’विरोध पक्ष’ राहिलेले नसून ’अवरोध पक्ष’ (अडथळे निर्माण करणारा गट) बनले आहेत. ते देशातील नागरिकांमध्ये फूट पाडू इच्छितात. राहुल गांधी यांच्या परदेश दौर्‍यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत मोदींनी प्रश्‍न उपस्थित केला. परदेशात कोण कोणाला गुपचूप भेटत आहे? भारताच्या विरोधात असलेल्या शक्‍ती कोणाला पाठिंबा देत आहेत? भारताच्या शत्रूंची भाषा कोण बोलत आहे? अशा शक्तींविरुद्ध देशाला एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे. समाज माध्यमाचा वापर एक शस्त्र म्हणून केला जात असूून अफवा पसरवून देशाची प्रतिमा मलिन केली जात आहे.
 
’वैचारिक नक्षलवाद्यां’चा अजूनही धोका 
 
जोपर्यंत देश नक्षलवाद आणि माओवादापासून मुक्त होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असे गेल्या वर्षी सांगितले होते. तो शब्द आम्ही पाळला आहे. आम्ही नक्षलवाद्यांचा खात्मा केला असला, तरी ’वैचारिक नक्षलवाद्यां’चा धोका अजूनही कायम आहे. देशाच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित करणे, घुसखोरी आणि लोकसंख्याशास्त्रीय बदल रोखणे, तसेच समान नागरी संहितेच्या दिशेने वाटचाल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे मोदी म्हणाले
 
आज शक्तिप्रदर्शन
 
नवी दिल्ली : एसआयआर प्रक्रिया थांबवावी आणि ज्ञानेश कुमार यांना मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून तातडीने हटविण्यात यावे, यासाठी ‘इंडिया’ आघाडीने आज (रविवारी) रामलीला मैदानावर मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून, ‘इंडिया’ आघाडीचे नेते आधीच दिल्लीत दाखल झाले असून, त्यांच्या समर्थकांचे आगमन सुरू आहे. दुसरीकडे, भाजपही शीख समाजाचा मोर्चा काढणार आहे. दिल्लीमध्ये टिळक नगरपासून हरीनगरपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्रीही सहभागी होण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने दोन्हीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. 

Related Articles