’आप’कडून 40 विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी   

भगवंत मान लढणार धुरी मतदारसंघातून

पंजाब विधानसभा निवडणूका 
 
चंडीगढ : आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आम आदमी पक्षाने (आप’) शनिवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात 40 विद्यमान आमदारांचा समावेश आहे. मुख्यमंत्री भगवंत मान हे धुरी मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला नाही. मात्र, ‘आप’ने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री मान यांनी राजधानी दिल्लीत ही यादी जाहीर केली. मान हे संगरुर जिल्ह्यातील धुरी मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. सध्या तुरुंगात असलेले कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांना लुधियाना पश्‍चिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. जीएसटी फसवणुकीशी संबंधित आर्थिक अफरातफर प्रकरणात त्यांना अटक झाली आहे. अरोरा यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याचे पहिल्या यादीत नाव नाही.
 
‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ’एक्स’ वरील पोस्टद्वारे सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.पंजाब विधानसभेचे अध्यक्ष आणि दोनवेळा आमदार राहिलेले कुलतार सिंग संधवान यांना कोटकपुरा मतदारसंघातून, तर उपसभापतींना गढशंकर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. चार महिला विद्यमान आमदारांना पारंपरिक मतदारसंघांतून पुन्हा संधी देण्यात आली आहे. यामध्ये दोनवेळा आमदार राहिलेल्या बलजिंदर कौर (तलवंडी साबो), इंद्रजित कौर मान (नकोदर), संतोष कटारिया (बालाचौर) आणि अमनदीप कौर अरोरा (मोगा) यांचा समावेश आहे. 
 
याखेरीज, तीन माजी मंत्र्यांनाही पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. यात पंजाब ’आप’चे मुख्य प्रवक्ते कुलदीप सिंग धालीवाल (अजनाला), इंद्रबीर सिंग निज्जर (अमृतसर दक्षिण) आणि ब्रह्म शंकर जिम्पा (होशियारपूर) यांचा समावेश आहे. 2022 मध्ये सत्ताधारी काँग्रेसचा पराभव करत ‘आप’ने सत्ता मिळवली होती. विधानसभेच्या 117 पैकी तब्बल 92 जागा ‘आप’ने पटकावल्या होत्या. तर, काँग्रेसला फक्त 18 जागांवर समाधान मानावे लागले होते. शिरोमणी अकाली दल 3, भाजप 2, बसपने 1 जागा जिंकली होती. तर, एक अपक्ष निवडून आला होता.

Related Articles