दिल्लीत कारखान्याला आग; चार कामगारांचा मृत्यू   

नवी दिल्ली : दिल्लीतील मंगोलपुरी औद्योगिक क्षेत्रातील (फेज 1) एका बूट निर्मिती कारखान्यात शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला. तर, दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी शनिवारी दिली.परवा रात्री साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल 33 वाहने लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करत पहाटे सहाच्या सुमारास आग आटोक्यात आणली. 
 
या इमारतीत तळघर, तळमजला आणि तीन वरचे मजले होते. तर चौथ्या मजल्यावर बांधकाम सुरू होते. कारखान्याच्या तळघरात ही आग लागली होती.बचावकार्यादरम्यान तिसर्‍या मजल्यावरून एका व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर पाच जण चौथ्या मजल्यावरील एका खोलीत अडकले होते. या सहाही जणांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढून मंगोलपुरीतील संजय गांधी मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले.  तिथे डॉक्टरांनी चार जणांना मृत घोषित केले. तर उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले. या दुर्घटनेत अशोक (25, मूळचा बिहारमधील नालंदा जिल्ह्याचा), हरिहर (40, मंगोलपुरीचा रहिवासी), लाल बाबू (38) आणि प्रेम चंद (50) या चार कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सुरेश चंद आणि अशोक यांना पोलिसांनी अटक केली असून, सध्या त्यांची चौकशी सुरू आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले. फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.

Related Articles