भोरच्या हिर्डस खोर्‍यात मुसळधार पाऊस   

भात पिकाचे नुकसान

भोर, (वार्ताहर) : भोर तालुक्यातील हिर्डस मावळ खोर्‍यातील पाच-सहा गावात शनिवारी पहाटे तीन ते सकाळी सात वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडला. यात भात पिकाचे नुकसान झाले. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तासभर पाऊस पडला होता. त्याचाही फटका अनेक शेतकर्‍यांना बसला. या भागातील शिरगाव कुंड, राजीवडी, शिळीम, उंबार्डे, आपटी, हिर्डोशी, भावेखल आदी परिसरातील भात पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे आढळले. 
 
मागील दीड महिना पाऊस नसल्यामुळे भाताच्या पिकाची वाढ समाधानकारक झाली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणांवर उत्पादनात घट अपेक्षित आहे. दरम्यान पहिला पाऊस झाल्यावर या भागात शेतकर्‍यांनी भाताचे तरवे टाकले होते. त्यांच्याकडे विहीर, नाला, नदीकाठ, डोंगरउतारावरील पाण्याची थोडीफार सोय होती. त्यामुळे या शेतकर्‍यांचे भात बर्‍यापैकी तग धरून होते. इतरांपेक्षा त्यांचे पीक अधिक जोमात होते. पाणी कमी पडल्याने काहींनी भात कापले होते. तर काही काढण्याच्या तयारीत होते. अशात शुक्रवारी व शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या खाचरात पाणी साचले. त्यामुळे कापलेले भात भिजले. तर काहींचे पीक आडवे झाल्याचे आढळले. मुळात पाऊस नसल्यामुळे भाताचे दाण्यांची वाढ समाधानकारक झाली नाही. तर आता झालेल्या पावसामुळे आलेल्या भाताचे नुकसान झाल्यामुळे दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles