नाशिक-पुणे रेल्वेचा निर्णय रखडला   

काकोडकर समितीच्या अहवालासाठी 90 दिवसांनंतरही प्रतीक्षा
 
मंचर, (वार्ताहर) : नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाचा प्रश्‍न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. समितीला अहवाल सादर करण्यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, 90 दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही अहवाल गुलदस्त्यात असल्याचा मुद्दा नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीने उपस्थित केला आहे.
 
जीएमआरटी प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींचा अभ्यास करून रेल्वेमार्गाबाबत योग्य तोडगा काढण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. नाशिक, पुणे आणि उत्तर अहिल्यानगर या भागांच्या औद्योगिक, कृषी, शैक्षणिक व व्यापारी विकासासाठी हा रेल्वेमार्ग महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, अहवाल सादर होण्यास होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. शासनाने अहवालाची सद्य:स्थिती स्पष्ट करून निर्णयाची निश्‍चित कालमर्यादा जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा तीन जिल्ह्यांत आंदोलन छेडण्याचा इशारा रेल्वे कृती समितीने दिला आहे.
 
नाशिक-पुणे रेल्वे हा तीन जिल्ह्यांच्या विकासाचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. समितीचा अहवाल रखडणे ही गंभीर बाब असून शासनाने तातडीने अहवाल जाहीर करून रेल्वेमार्गाबाबत ठोस निर्णय घ्यावा. 
- राजेंद्र चौधरी,उपाध्यक्ष पुणे नाशिक रेल्वे संघर्ष कृती समिती खेड.

Related Articles