उजनीच्या पाण्यासाठी महामार्ग रोखला   

एआय डेटा सेंटर, सोलर, अणुऊर्जा प्रकल्पांना विरोध 

टेंभुर्णी, (वार्ताहर) : उजनी धरणावरील प्रस्तावित एआय डेटा सेंटर, सौरऊर्जा, लघु मॉड्युलर अणुऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावरील रांझणी चौकात शनिवारी शेतकरी, वारकरी आणि मच्छिमारांनी रास्ता रोखा आंदोलन करत संताप व्यक्त केला. पुणे, सोलापूर, अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यांतील नागरिकांच्या सहभागामुळे आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. आमदार रोहित पवार, ज्येष्ठ नेते महादेव जानकर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार नारायण पाटील, संजय शिंदे, अभिजित पाटील, नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी आंदोलकांशी संवाद साधला.
 
प्रस्तावित प्रकल्प शेती, मत्स्यव्यवसाय आणि पर्यावरणासाठी घातक ठरू शकतात, अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली. एआय डेटा सेंटरसाठी तब्बल नऊ टीएमसी पाणी लागणार असल्याचा दावा करत, एवढ्या मोठ्या जलस्रोताचा वापर झाल्यास शेती आणि मच्छिमारांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता त्यांनी मांडली. स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार नसताना प्रदूषणकारी प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारले जात आहेत. 
 
जनसुनावणीशिवाय प्रकल्प नको 
 
आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या वतीने जनसुनावणीच्या माध्यमातून स्थानिकांना विश्‍वासात घेतल्याशिवाय कोणताही प्रकल्प होणार नसल्याचे आश्‍वासन देण्यात आले. भविष्यात सरकारने प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास यापेक्षाही मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.यावेळी अनिकेत देशमुख, शितलदेवी, संजय कोकाटे, सुभाष  गुळवे, शामसुंदर महाराज सोन्नर, महारुद्र पाटील, दिग्विजय बागल, नंदकुमार नगरे, सिताराम नगरे, निलेश देवकर, दत्ता महाराज दोन्हे पाटील यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर, शेतकरी आणि स्थानिक मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles