पुणेकरांच्या तेरा टीएमसी पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार : श्रीनाथ भिमाले   

पुणे : शहरासाठी कालवा समितीच्या बैठकीत वर्षभरासाठी मंजूर करण्यात आलेल्या 13.50 टीएमसी पाणी कोट्यापैकी 6.35 टीएमसी पाणी आतापर्यंत वापरून झाले आहे. त्यामुळे पुढील आठ महिन्यांसाठी पुणेकरांच्या वाट्याला केवळ 7.15 टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. 80 लाख लोकसंख्येच्या पुणे शहरासाठी एवढे पाणी अपुरे पडण्याची शक्यता असल्याने पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबर पासून 30 जून 2027 पर्यंत पुणे शहराला 13 टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
 
पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कालवा समितीची बैठक झाली. या बैठकीला जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पुण्यातील काही आमदार आणि महापौर मंजुषा नागपुरे उपस्थित होत्या. या बैठकीत पुणे महापालिकेसाठी 1 जुलै ते 30 जून या कालावधीसाठी 13.50 टीएमसी पाणी कोटा निश्चित करण्यात आला.
 
मात्र, हा कोटा 1 जुलैपासून लागू असल्याचे स्पष्ट झाल्याने पुणेकरांच्या पाण्याचे गणित बिघडले आहे. आतापर्यंत 6.35 टीएमसी पाण्याचा वापर झाला असून, उर्वरित कालावधीसाठी केवळ 7.15 टीएमसी पाणी उपलब्ध राहणार आहे. विशेष म्हणजे, कालवा समितीच्या बैठकीत मंजूर झालेला कोटा 1 नोव्हेंबरपासून लागू होईल, असे गृहीत धरले जात होते. मात्र, प्रशासकीय पातळीवर हा कोटा 1 जुलैपासून असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पुणे शहराला पुढील आठ महिने उपलब्ध होणाजया पाण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
 
यंदा अल निनोच्या प्रभावामुळे जुलैचा अपवाद वगळता पुढील महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी राहिले. परिणामी धरणांतील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. राज्य शासनाने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देतानाच 10 टक्के पाणी कपातीचे आदेश दिले आहेत. पुणे शहरातही गेल्या महिनाभरापासून 10 टक्के पाणी कपात लागू आहे. त्यातच दिवाळीनंतर दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात पुणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

Related Articles