दिवाळीच्या गर्दीने मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी   

अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा 

पुणे : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये पुणेकरांनी मोठी गर्दी केल्याने शहराच्या मध्यभागातील प्रमुख मार्गांवर सलग दुसर्‍या शनिवारी दिवसभर वाहतूक कोंडी झाली. रविवार पेठ, बोहरी आळी, महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, गणेश पेठ, शुक्रवार पेठ आणि बुधवार पेठे परिसरात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या. दुहेरी पार्किंग, नो-पार्किंगमध्ये उभी केलेली वाहने आणि नो-एंट्रीतून होणारी वाहतूक यामुळे कोंडीत आणखी भर पडली.
 
लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर कोंडी झाली होती. टिळक चौकातून बाजीराव रस्त्याकडे जाण्यासाठी वाहनचालकांना सुमारे 30 ते 40 मिनिटांचा वेळ लागत होता. शनिवारवाड्यापासून शिवाजी रस्त्याने स्वारगेटच्या दिशेने जाण्यासाठीही जवळपास तेवढाच वेळ लागला. फडके हौद ते लाल महाल चौक आणि क्वार्टर गेट चौक ते टिळक चौक या लक्ष्मी रस्त्याच्या मार्गावर अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला होता. नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), जंगली महाराज रस्ता आणि टिळक रस्त्यावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
 
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये कपडे, दागिने, सजावटीचे साहित्य, फराळाचे पदार्थ आणि अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी शहरासह उपनगर आणि जिल्ह्यातून नागरिक दाखल होत आहेत. शनिवारची सुट्टी आणि दिवाळीची खरेदी यामुळे आज बाजारपेठांमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. पादचारी आणि वाहनांची संख्या एकाच वेळी वाढल्याने अरुंद रस्त्यांवर वाहतूक सुरळीत ठेवताना वाहतूक पोलिसांचीही कसरत होत होती.
 
नो-एंट्रीमध्येही वाहतूक कोंडी 
 
मध्यवर्ती भागातील अनेक रस्त्यांवर दुहेरी पार्किंगमुळे वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी झाली आहे. त्यातच नो-पार्किंगच्या ठिकाणी वाहने उभी केल्याने इतर वाहनांना मार्ग काढताना अडचणी येत आहेत. काही ठिकाणी नो-एंट्री असतानाही वाहने प्रवेश करत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. एका रस्त्यावर निर्माण झालेल्या कोंडीचा परिणाम लगतच्या रस्त्यांवर होत असल्याचे चित्र दिवसभर दिसून आले.
 
अवजड वाहनांना वाहतूक बंदी 
 
दिवाळीच्या खरेदीमुळे मध्यवर्ती भागातील वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर शनिवार-रविवारी अवजड वाहनांना असलेली परवानगी तात्पुरती रद्द केली आहे. हा निर्बंध दिवाळी संपेपर्यंत लागू राहणार आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.

Related Articles