मुग्धा देशमुखच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले   

पोलिसांसमोर आव्हान 

पुणे : लंडनमध्ये एमबीएचे उच्चशिक्षण घेण्यासाठी गेलेली 34 वर्षीय मुग्धा देशमुख हिचा मृतदेह पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमधील बंद फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, लंडनहून भारतात परतल्यानंतर मुग्धाने कुटुंबीयांनाही याची कल्पना दिली नव्हती. शेजार्‍यांशी संपर्क नाही, घरी पाहुण्यांची ये-जा नाही, घरकाम करणार्‍या महिलेला अचानक कामावर येण्यास मनाई आणि सदनिकेच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा दोन महिन्यांपासून बंद असल्याने अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे मृत्यूचे गूढ अधिकच गडद झाले असून पोलिसांसमोर कडवे आव्हान असणार आहे. 
 
मुग्धा देशमुख ही मूळची छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी होती. जुलै 2025 मध्ये ती एमबीएच्या उच्चशिक्षणासाठी लंडनला गेली होती. मात्र, ऑगस्ट 2026 मध्ये ती कोणालाही कल्पना न देता भारतात परतली. त्यानंतर पुण्यातील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये अधिकृत भाडेकरार करून ती एकटीच राहू लागली. पुण्यात असताना ती एमबीएच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवत असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. दरम्यान, मुलीशी संपर्क होत नसल्याने तिचे वडील अविनाश देशमुख यांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान मुग्धा पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे पथक बुधवारी (28 ऑक्टोबर) पहाटे साडेपाचच्या सुमारास पुण्यातील संबंधित सोसायटीत पोहोचले.
 
सोसायटीतील टॉवर क्रमांक 11 मधील सदनिका क्रमांक 2307 चा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दुसर्‍या चावीच्या साहाय्याने दरवाजा उघडला. त्यावेळी घरातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. पोलिसांनी आत जाऊन पाहणी केली असता बेडवर मुग्धाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहता तिचा मृत्यू काही दिवसांपूर्वीच झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
एकाकी जीवन, शेजार्‍यांशीही संपर्क टाळला
 
पोलिसांनी सोसायटीतील रहिवासी, शेजारी आणि सुरक्षारक्षकांकडे चौकशी केली असता मुग्धाच्या एकाकी जीवनशैलीबाबत धक्कादायक माहिती समोर आली. ती कोणाशीही फारशी बोलत नव्हती. तिच्या  सदनिकेमध्ये कोणाचीही ये-जा दिसत नव्हती. सोसायटीच्या गोल्फ कोर्स परिसरात ती कधीतरी फिरताना दिसायची; मात्र तिचा इतर रहिवाशांशी कोणताही सामाजिक संपर्क नव्हता. सुरक्षारक्षकानेही तिच्या घरी पाहुणे आल्याचे कधी पाहिले नसल्याचे सांगितले.
 
मृत्यूच्या आठवडाभर आधीच घरकाम महिलेला सुट्टी
 
21 ऑक्टोबर रोजी मुग्धाने घरकाम करणार्‍या महिलेला पूर्ण महिन्याचा पगार दिला होता. आपण बाहेरगावी जाणार असल्याचे सांगून तिने त्या महिलेला यापुढे कामावर येण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे मुग्धा नेमकी कुठे जाणार होती, तिने अचानक काम बंद का केले आणि त्यानंतर तिच्यासोबत नेमके काय घडले, याचा तपास पोलिस करीत आहेत.
 
सीसीटीव्ही बंद, मोबाइल कॉल डिटेल्स पोलिसांच्या रडारवर
 
मुग्धाच्या सदनिकेच्या परिसरावर नजर ठेवणारा सीसीटीव्ही कॅमेेरा गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या कालावधीत सदनिकेमध्ये कोण आले होते, मुग्धाची कोणाशी भेट झाली होती का? याबाबतचे महत्त्वाचे पुरावे मिळविण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. मुग्धाच्या मोबाइलचे कॉल डिटेल्स, संपर्कातील व्यक्ती आणि व्हॉट्सअ‍ॅपवरील संवाद तपासण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.

Related Articles