कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात 23 कंपन्यांची नावे समोर   

पुरावे घेऊन आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहण्याचे आवाहन 

पुणे : दरमहा मोठ्या प्रमाणात अतिरिक्त परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात 23 कंपन्यांचे संचालक, प्रमोटर आणि संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी गुंतवणुकीचे पुरावे आणि संबंधित कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 
याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. संबंधित कंपन्यांचे संचालक आणि प्रमोटर यांनी गुंतवणूकदारांना विविध योजनांमध्ये पैसे गुंतविण्यास प्रवृत्त केले. त्याबदल्यात दरमहा मोठ्या प्रमाणात अतिरिक्त परतावा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले होते. या प्रकरणात अनेक व्यक्ती आणि कंपन्यांची नावे तपासात समोर आली आहेत.
 
यामध्ये लवीश चौधरी ऊर्फ नवाब अली (रा. दुबई, मूळ रा. मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश), विजय नारायण नायडू, राजबंदिनी विजय नायडू, कुणाल रामदास खेडेकर, वैशाली कुणाल खेडेकर, उमेश जरग, ज्ञानेश्वरी उमेश जरग, साहील दिलीप धुमाळ, समीर काटे, शैलेश कणव, प्रमोद कदम, भरतकुमार सोलंकी, पोपट चोरगे आणि ललित प्रजापती यांच्यासह विविध कंपन्यांच्या संचालकांचा समावेश आहे. तसेच बोट ब्रो, माईन क्रिप्टो, क्रॉस मार्केट, ट्रिलेनिअर टोकन, लायकेन्स रिअ‍ॅलिटी, ऑनझो ऑनलाइन प्लॅटफॉर्म, मेडीसा ग्लोबल, एक्सएफएक्स ट्रेड आणि बिटनोव्हा या कंपन्यांच्या संचालकांचाही या गुन्ह्याच्या तपासात समावेश आहे.
 
या कंपन्यांमध्ये किंवा संबंधित योजनांमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली आहे, अशा नागरिकांनी गुंतवणुकीची पावती, बँक व्यवहारांचे तपशील, करारपत्रे, ऑनलाइन व्यवहारांचे पुरावे तसेच इतर संबंधित कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणात आपल्याकडे संबंधित माहिती किंवा गुंतवणुकीचे पुरावे असल्यास ते तपास यंत्रणेला उपलब्ध करून देऊन तपासात सहकार्य करावे, असेही आर्थिक गुन्हे शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles