केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या खटल्याला अखेर सुरुवात   

17 नोव्हेंबरला जामीन आणि दोषमुक्ती अर्जांवर सुनावणी  

पुणे : लोहगडावर केतन अग्रवाल याची निर्घृण हत्या करून मृतदेह दरीत फेकल्याच्या बहुचर्चित प्रकरणाने आता न्यायालयीन प्रक्रियेत निर्णायक टप्प्यात प्रवेश केला आहे. या हत्याकांडाने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर आता प्रत्यक्ष खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली असून पहिल्याच सुनावणीत आरोपींच्या जामीन आणि दोषमुक्तीच्या अर्जांवरून न्यायालयात महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या.
 
या खटल्यात सरकार पक्षातर्फे न्यायालयात उपस्थित राहताच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी खटल्याची सुनावणी तातडीने सुरू करण्याची विनंती केली. सरकारकडे तिन्ही आरोपींविरोधात उपलब्ध असलेले पुरावे, संबंधित कागदपत्रे आणि सरकार पक्षाची बाजू न्यायालयासमोर मांडण्यासाठी त्यांची सविस्तर जंत्री सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानुसार आरोप निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.
 
दरम्यान, मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या वतीने बचाव पक्षाच्या वकिलांनी खटल्यातून दोषमुक्त करण्यासह जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात दोन स्वतंत्र अर्ज दाखल केले. या अर्जांवर भूमिका स्पष्ट करताना उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षाचा खटला नेमका काय आहे, आरोपींविरोधात कोणते पुरावे आहेत आणि कोणत्या कागदपत्रांच्या आधारे सरकार आरोप सिद्ध करणार आहे, याची माहिती न्यायालयासमोर सादर होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. ही प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी जामिनाच्या अर्जावर विचार करणे योग्य ठरणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.
 
या खटल्यातील तिसरा आरोपी रितेश याने अद्याप न्यायालयात वकिलपत्र दाखल केलेले नसल्याची बाबही सुनावणीदरम्यान समोर आली. त्यावर न्यायालयाने पुढील तारखेपर्यंत वकील नियुक्त करण्याचे निर्देश दिले. निर्धारित मुदतीत वकील नियुक्त न केल्यास न्यायालयाकडूनच कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. अन्य एका आरोपीने स्वतंत्र वकील नियुक्त करण्याची तयारी दर्शविली असली, तरी न्यायालयाने त्यालाही अंतिम संधी देत स्पष्ट शब्दांत ताकीद दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यावेळी सरकार पक्षाचा युक्तिवाद, आरोपींचे जामीन अर्ज आणि खटल्यातून दोषमुक्त करण्यासाठी दाखल केलेल्या अर्जांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles