आर्यन पंप्सच्या संशोधन केंद्राला मुख्यमंत्र्यांची भेट   

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनापती बापट रस्त्यावरील आर्यन हाऊस येथे आर्यन पंप्स अँड एन्व्हायरो सोल्युशन्स प्रा. लि.च्या ग्लोबल डिझाइन आणि इनोव्हेशन सेंटरला भेट देऊन संशोधन व तंत्रज्ञानविषयक कामकाजाची माहिती घेतली. महाराष्ट्रातील उद्योजक आणि अभियंत्यांच्या कौशल्याचे कौतुक करत त्यांनी ‘मेड इन महाराष्ट्र, मेड फॉर द वर्ल्ड’ असा अभिप्राय नोंदविला.कंपनीच्या केंद्रात विकसित करण्यात आलेले अत्याधुनिक हायड्रॉलिक पंप, इंजिनचलित पंप संच, जेटिंग रिसायकलर्स आणि आपत्कालीन सेवांसाठीच्या वाहनांच्या संशोधन व निर्मिती प्रक्रियेची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. कंपनीने तयार केलेल्या अत्याधुनिक पंप यंत्रणांनी सुसज्ज वाहनाचीही त्यांनी पाहणी केली.कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत सुतार यांनी संशोधन व तंत्रज्ञानविषयक कामकाजाची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कंपनी आणि अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या. ’मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी उपस्थित होते.

Related Articles