सीमा पुन्हा अशांत   

शंतनु चिंचाळकर

भारत-चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर चिनी सैनिकांनी केलेल्या  गस्तीच्या उल्लंघनामुळे पुन्हा तणाव वाढला आहे. मात्र सरकारने या बद्दल काहीही सांगितलेले नाही.
चीन लगतच्या अरुणाचल प्रदेशाच्या सीमेवर चीनने नवी आगळीक केली आहे की घुसखोरी? भारताचे जवान आणि चिनी सैनिक यांच्यात चकमकी झडल्या आहेत का?इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस या निमलष्करी संघटनेचे महासंचालक शत्रुजित कपूर यांच्या विधानांमुळे पूर्व किंवा ईशान्य सीमेवरील परिस्थितीबाबत  संभ्रम निर्माण झाला आहे.
 
शत्रुजित कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिकडच्या काळात अरुणाचल प्रदेशमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर चिनी सैन्यासोबत अनेक ठिकाणी संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली . विशेषत: जुलै महिन्याच्या अखेरपासून ऊपरी सुबनसिरी जिल्ह्यातील असाफिला आणि माजा परिसरात चिनी सैन्याच्या हालचालींमुळे तणाव वाढला. अरुणाचलच्या अनेक भागात ’चकमकी’ झाल्याचे व त्या ’अजूनही’ चालू असल्याचे  त्यांच्या बोलण्यावरून जाणवते. त्यांनी इंग्रजीत ’स्टँड ऑफ’असा शब्द वापरला.त्याचा अर्थ ’गतिरोध’ किंवा ’अडथळा’ असाही होतो. मात्र दोन देशांच्या लष्करांच्या बाबतीत हा अर्थ संकुचित वाटतो.
 
या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ’गस्तीच्या प्रस्थापित पद्धतीपासून चिनी सैनिक वेळोवेळी भरकटत  असल्याने भारत-चीन सीमेवरील स्थिती अशांत बनत असल्याचे आम्ही या पूर्वीही नमूद केले आहे’ अशा आशयाच्या  इंग्रजी शब्दांत  प्रतिक्रिया दिली आहे.चिनी सैनिकांनी सीमा ओलांडली असा त्याचा अर्थ होतो.
 
राजनैतिक आणि लष्करी पातळीवर चर्चा सुरू असतानाच सीमेवर निर्माण होणारा हा तणाव केवळ स्थानिक पातळीवरील मतभेद नसून, त्यामागे चीनची एक मोठी धोरणात्मक आणि विस्तारवादी खेळी  असल्याचे अधोरेखित होते. 
 
भारत आणि चीनदरम्यान सुमारे ३,४८८ किलोमीटर लांबीची प्रत्यक्ष ताबा रेषा आहे, जी पूर्णपणे सीमांकित झालेली नाही. अरुणाचल प्रदेशाच्या पश्चिमेकडील तवांगपासून पूर्वेकडील अंजाव जिल्ह्यापर्यंतचा भाग भारताचा अभिन्न भाग असतानाही चीन त्यावर आपला दावा सांगत आला आहे. चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेट (झँगनान) संबोधून तेथील भौगोलिक सार्वभौमत्वाला सातत्याने आव्हान देण्याचा प्रयत्न करतो. ऊपरी सुबनसिरी, असाफिला आणि माजा हे भाग भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम, दाट जंगलांचे आणि डोंगराळ आकाराचे आहेत.
 
२०२० च्या मे महिन्यात चीनने लडाख मध्ये घुसखोरी केली. नंतर   चीनने या भागात आपल्या सैन्याची उपस्थिती आणि पायाभूत सुविधांचे जाळे प्रचंड प्रमाणात वाढवले आहे.   चीनची ही कृती तिच्या सलामी स्लायसिंग आणि ग्रे-झोन वॉरफेअर या धोरणात्मक विस्तारवादी खेळीचा भाग मानली पाहिजे. थेट मोठे युद्ध न पुकारता, हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने दुसर्‍या देशाच्या भूभागावर अतिक्रमण करणे, तेथे लष्करी किंवा नागरी पायाभूत सुविधा (जसे की मॉडेल गावे)  उभारणे आणि नंतर तीच नवी स्थिती म्हणून प्रस्थापित करणे, हे चीनचे जुने तंत्र आहे. 
 
चीनचे अध्यक्ष  झी जिनपिंग २०१९च्या ऑक्टोबरमध्ये दोन दिवस  भारतात होते.प्रादेशिक सुरक्षितता,आर्थिक सहकार्य यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व झी यांच्यात  चर्चा झाल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते.मात्र अधिकृत संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले नव्हते.त्या नंतर जेमतेम सात महिन्यांत चीनने आक्रमण केल्याने मोदी यांची मुत्सद्देगिरी साफ अपयशी ठरली हे सिद्ध झाले.
 
पूर्व लडाखमधील गलवान खोर्‍यातील हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय लष्करी आणि राजनैतिक चर्चांच्या अनेक फेर्‍या झाल्या, तरीही चीनच्या धोरणात कोणताही मूलभूत बदल झालेला नाही. चर्चेचा  एक मार्ग सुरू ठेवायचा आणि दुसरीकडे सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करून लष्करी तणाव निर्माण करायचा, ही चीनची दुहेरी भूमिका आहे. आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या आपण पुढे आहोत या अहंकारातून चीन आंतरराष्ट्रीय नियम आणि परस्पर समजुती धाब्यावर बसवताना दिसतो. 
 
भारताच्या दृष्टीने या भू-राजकीय घडामोडींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ईशान्य भारताची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्व राखण्यासाठी प्रप्रत्यक्ष नियंत्र्त्रण रेषे वरील  स्थैर्य अत्यंत महत्त्वाचे आहे. अरुणाचल प्रदेश ही भारताच्या पूर्वेकडील सुरक्षेची मजबूत ढाल मानली जाते. चीनला या भागात मनमानी करू दिली, तर भारताच्या सुरक्षेला आणि ईशान्येकडील राज्यांच्या जोडणीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय, जागतिक पटलावर भारत एक जबाबदार लोकशाही आणि आर्थिक सत्ता म्हणून उदयास येत असताना या देशाला आपल्याच सीमांवर गुंतवून ठेवणे आणि त्याच्या संसाधनांचा मोठा भाग सीमारक्षणात खर्च करण्यास भाग पाडणे, हा चीनचा छुपा हेतू असू शकतो.त्यामुळे भारतासाठी ही केवळ सीमेवरील चकमक नसून देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचे आणि धोरणात्मक स्वायत्ततेचे मोठे आव्हान आहे. 
 
चीनच्या धोक्याला तोंड देण्यासाठी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसने े ड्रोन प्लाटून तयार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे.  दुर्गम डोंगराळ भागात शत्रूच्या हालचालींवर २४ तास लक्ष ठेवण्यासाठी आणि तात्काळ प्रतिहल्ला करण्यासाठी ड्रोन अत्यंत प्रभावी ठरत आहेत. याशिवाय, गलवानसारख्या हिंसक आणि शारीरिक संघर्षाच्या अचानक उद्भवणार्‍या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आयटीबीपीने ‘स्ट्राईक’ नावाचा एक विशेष आणि खडतर प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित केला आहे. २०२७ च्या अखेरपर्यंत चीन सीमेवर तैनात असलेल्या सर्व जवानांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे भारताची शौर्य कमांडो पथके आणि सीमा सुरक्षा दल कोणत्याही धोक्याचा सामना करण्यास सदैव सज्ज राहतील.
 
दुसरे  म्हणजे लष्करी सामर्थ्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा (उदा. कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह टेहळणी, आणि सायबर यंत्रणांचा) अधिक व्यापक वापर करावा लागेल. त्याचवेळी राजनैतिक पातळीवर चीनच्या विस्तारवादी धोरणाचा जागतिक व्यासपीठांवर बुरखा फाडणे आणि अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया यांच्यासोबतच्या क्वाड किंवा इतर प्रादेशिक आघाड्यांच्या माध्यमातून हिंदी महासागर आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनवर धोरणात्मक दबाव कायम ठेवणे गरजेचे आहे. 
 
भारत आणि चीन यांच्यातील तणाव हा तात्कालिक नसून दीर्घकालीन भू-राजकीय संघर्षाचे प्रतीक आहे. चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे पूर्व सीमेवरील परिस्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. २०२० मधील घुसखोरी नंतर चीनने किती भारतीय भूभाग बळकावला आहे या बद्दल अधिकृत माहिती मिळत नाही.मात्र सुमारे १ ते २ हजार चौरस किलोमीटरचा भाग चीनच्या ताब्यात असावा असा अंदाज आहे. पूर्व  सीमेवरील परिस्थिती ’अशांत’ असल्याचे कपूर यांच्या वक्तव्यावरून जाणवते. पण‘सत्य स्थिती’ काय आहे हे कसे कळणार?     

Related Articles