E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
रविवार केसरी
स्पंदनाच्या साक्षी दडपण्याचा प्रयत्न
Samruddhi Dhayagude
01 Nov 2026
जनार्दन पाटील
दिल्लीतील ‘बिकानेर हाऊस’मधील एका छायाचित्र प्रदर्शनातील १०५ पैकी तब्बल ७५ छायाचित्रे उद्घाटनाच्या काही तास आधी प्रशासनाने हटवली. प्रियांका गांधी यांचे चिरंजीव रेहान यांच्या ‘नो आयडिया इज फायनल’ या प्रदर्शनातून युवा आंदोलने, राजकीय निदर्शने आणि राष्ट्रीय ध्वजाचे छायाचित्रही काढून घेण्यात आले.रिकामी चौकटही तेथे ठेवू दिली नाही. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच आहे.
भिंतीवर लटकलेली एक रिकामी लाकडी चौकट केवळ चित्राच्या अभावाची साक्ष देत नसते, तर ती व्यवस्थेच्या अंतर्मनातील भीती, अस्वस्थता आणि संकुचितपणाचे उघडेवाघडे प्रदर्शन मांडत असते. राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित ‘बिकानेर हाऊस’च्या कलादालनात नुकतेच घडलेले नाट्य याच विदारक सत्यावर लख्ख प्रकाश टाकणारे आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे चिरंजीव व युवा छायाचित्रकार रेहान यांच्या ‘नो आयडिया इज फायनल’ या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होण्याच्या काही काळ आधी प्रशासनाकडून १०५ पैकी सुमारे ७५ छायाचित्रे तातडीने हटवण्याचे आदेश देण्यात आले. प्रदर्शन वाचवण्यासाठी रेहान यांनी ती चित्रे काढली आणि त्या जागी उरल्या केवळ रिकाम्या भिंती आणि रिकाम्या फ्रेम्स. प्रशासनाने नंतर त्या रिकाम्या फ्रेम्सही काढून घेण्यास भाग पाडले. कलादालनातील ही रिक्तता भारताच्या लोकशाही अवकाश आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या स्थितीवर उमटलेले एक गंभीर प्रश्नचिन्ह बनून उभी राहिली आहे.
२४ वर्षांच्या एका नवोदित छायाचित्रकाराची किंवा त्याच्या ७५ छायाचित्रांची एका बलाढ्य सरकारला भीती वाटू शकते का, या प्रश्नाचे उत्तर व्यक्तीमध्ये नसून ती व्यक्ती ज्या प्रतीकांचे प्रतिनिधित्व करते, त्यात आहे. पहिली बाब म्हणजे, रेहान यांचे आडनाव वढेरा आणि घराणे गांधी आहे. विद्यमान सत्ताधार्यांना नेहरु-गांधी आडनावांचे वावडे आहे.
राजकीय चर्चांच्या आणि सत्ताकारणाच्या गदारोळापासून स्वतःला काहीसे अलिप्त ठेवत रेहानने एक छायाचित्रकार, व्हिज्युअल आर्टिस्ट आणि क्युरेटर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. लंडनच्या ‘एसओएएस’ विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या रेहानसाठी छायाचित्रण हा निव्वळ छंद नसून विचारप्रक्रिया मांडण्याचे सशक्त माध्यम आहे.
रेहानच्या मते, कोणतीही कला ही काळापासून आणि सामाजिक वास्तवापासून वेगळी राहू शकत नाही. कलेचा आणि राजकारणाचा एक अविभाज्य संबंध असतो. राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त अशी कला असूच शकत नाही, ही त्याची ठाम धारणा आहे. त्याचा कॅमेरा केवळ निसर्गसौंदर्य किंवा वन्यजीवांचे मोहक रूप टिपण्यापुरता मर्यादित नाही, तर देशातील रस्त्यांवर घडणार्या घडामोडींचे, सर्वसामान्य नागरिकांच्या संघर्षाचे आणि काळाच्या स्पंदनांचे साक्षीदार होण्याचा प्रयत्न करतो. ‘नो आयडिया इज फायनल’ या शीर्षकातच एक प्रवाही, लवचिक आणि संवादाला वाव देणारा दृष्टिकोन दडला आहे; मात्र प्रशासनाला हाच संवाद आणि हीच लवचिकता असह्य झाली, हेच ताज्या घडामोडींमधून समोर आले.
रेहानच्या प्रदर्शनात गेल्या सहा महिन्यांमध्ये देशात घडलेल्या विविध घडामोडींची दृश्ये नोंद होती. त्यात वन्यजीव छायाचित्रांसोबतच देशातील ज्वलंत युवा आंदोलनांची छायाचित्रे होती. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणार्या ‘नीट’ परीक्षेतील कथित गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांनी छेडलेले तीव्र आंदोलन, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधातील विरोधी पक्षांची निदर्शने, या आंदोलनांमध्ये सहभागी झालेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतानाची दृश्ये आणि सर्वात धक्कादायक म्हणजे आपल्या राष्ट्रीय ध्वजाचे सौंदर्य टिपणारी दोन छायाचित्रे त्यात होती. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, देशातील सद्यस्थिती आणि राजकीय वातावरण पाहता अशा प्रकारच्या राजकीय विषयांवरील छायाचित्रांचे प्रदर्शन करण्यासाठी ‘ही योग्य वेळ नाही’, परंतु रेहानने १५ ऑक्टोबरलाच प्रदर्शनाची संपूर्ण मांडणी प्रशासनाकडे सादर केली आणि त्यावर प्रशासनाने केवळ ‘नोंद घेतली’ असे सांगितले होते. अशा वेळी उद्घाटनाच्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता नोटीस बजावून पाच वाजेपर्यंत चित्रे काढायला लावण्यामागे केवळ प्रशासकीय नियम होते की राजकीय दबाव, असा प्रश्न उपस्थित होतो. आंदोलनाची छायाचित्रे म्हणजे निव्वळ दस्तावेजीकरण असते. त्यात कोणतीही चिथावणीखोर भाषा नसते की कोणावर खालच्या पातळीवरील व्यक्तिगत टीका नसते, तरीही प्रशासनाला या चित्रांची धास्ती का वाटावी? सर्वात महत्वाचे म्हणजे, राष्ट्रध्वजाचे छायाचित्र प्रदर्शित करण्यास मनाई करण्याचे कारण काय ? या आधीही जगप्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या चित्रांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी त्यांच्या प्रदर्शनांची तोडफोड केली. अखेर त्यांना आयुष्याच्या उत्तरार्धात स्वतःच्याच देशातून परागंदा होऊन कतारचे नागरिकत्व पत्करावे लागले. सामाजिक आणि राजकीय वास्तवावर परखड भाष्य करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांच्या प्रत्येक माहितीपटाला (उदा. राम के नाम, फादर, सन्स अँड होली वॉर) सेन्सॉर बोर्डाशी आणि न्यायालयांशी लढा देऊनच जनतेसमोर आणावे लागले. अलिकडील वर्षांमध्ये ललित कला अकादमी, ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ (एनजीएमए) यांसारख्या संस्थांमध्येही उजव्या विचारधारेला सोयीचे नसलेले कार्यक्रम रद्द करण्याचे प्रकार घडले आहेत. प्रसिद्ध नाटककार अमोल पालेकर यांना एका व्याख्यानादरम्यान व्यवस्थेवर टीका करताना भाषण थांबवण्यास सांगण्यात आले होते. राजसत्तेला वास्तव पचनी पडत नाही, तेव्हा तेव्हा ती आरसा फोडण्याचा प्रयत्न करते. रेहान यांच्या प्रदर्शनातील चित्रे हटवणे, ही याच दीर्घ परंपरेतील आणखी एक काळी नोंद ठरली आहे.
घटनेच्या कलम १९(१)(अ) अन्वये प्रत्येक नागरिकाला भाषण आणि अभिव्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य दिले आहे. अर्थात, कलम १९(२) नुसार त्यावर देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षितता, सार्वजनिक सुव्यवस्था या कारणास्तव ‘वाजवी बंधने’ घालता येतात; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये या ‘वाजवी बंधनां’चा अर्थ सत्ताधार्यांच्या सोयीनुसार लावला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्यार्थ्यांचे आंदोलन टिपणे म्हणजे देशाची सुरक्षितता धोक्यात आणणे नव्हे. कलाकाराचे काम समाजातील अशांतता, अस्वस्थता कॅमेर्याच्या किंवा कुंचल्याच्या माध्यमातून टिपून ठेवत व्यवस्थेला आत्मपरीक्षण करायला भाग पाडणे हे असते. सार्वजनिक निधीतून चालणार्या ‘बिकानेर हाऊस’सारख्या कलादालनांमध्ये राजकीय वास्तवाचे दस्तावेजीकरण दाखवण्यावर बंदी घातली जाते, तेव्हा घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याची केवळ गळचेपीच होत नाही, तर लोकशाहीचा अवकाश पद्धतशीरपणे आकुंचित केला जात असल्याचे स्पष्ट होते. दुसरी आणि अधिक महत्त्वाची बाब म्हणजे, त्या छायाचित्रांमधील विषय. ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराने देशभरातील मध्यमवर्गीय, कष्टकरी कुटुंबांमधील लाखो विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या भावना दुखावल्या आहेत. हे आंदोलन केंद्र सरकारसाठी अत्यंत अडचणीचे ठरले होते. राहुल यांना पोलिसांनी ताब्यात घेतानाची दृश्ये ही विरोधी पक्षाचा संघर्ष आणि प्रशासनाचा बळाचा वापर अधोरेखित करणारी होती. थोडक्यात, ही छायाचित्रे म्हणजे सत्ताधार्यांच्या कथित प्रशासकीय अपयशाचा आणि जनक्षोभाचा दृश्य पुरावा होती. व्यवस्थेला रेहान या व्यक्तीची भीती वाटत नसेलही; परंतु त्या चित्रांमधून जिवंत होणार्या जनआक्रोशाची आणि त्यातून निर्माण होणार्या जनमताची भीती निश्चितच वाटत असावी.
Related
Articles
दिल्लीत पाच वर्षांतील सर्वांत जास्त प्रदूषित दिवाळी
11 Nov 2026
डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ल क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन
06 Nov 2026
दुष्काळग्रस्त भागांची गोखले संस्थेकडून पाहणी; दीड महिन्यात शासनाला अहवाल
06 Nov 2026
इस्रायलला शस्त्रखरेदीसाठी निधी देणार नाही
06 Nov 2026
म्हसवडच्या सिद्धनाथांचा मंगळवारपासून विवाह सोहळा
08 Nov 2026
दीपोत्सवातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)