धास्ती वीजटंचाई आणि महागाईची   

देशात वीजटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता दिसू लागली आहे. दरम्यान,  ४१ जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षकांनी निदर्शनाला आणले आहे. त्यामुळे सामान्यांचे रोजचे भोजन महागले आहे.
 
वर्षाच्या अखेरच्या तिमाहीमध्ये देशात वीजटंचाईचे संकट निर्माण होत असल्याचे दिसत आहे.  अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे जादा विजेची मागणी नोंदवली आहे. कोळशापासून वीजनिर्मितीत वाढ होऊनही मागणीनुसार वीजपुरवठा करणे कठीण होत आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये भारतातील वीजटंचाई वाढून ५६ कोटी युनिट्सवर (५६० दशलक्ष किलोवॉट-तास) पोहोचली. ऑगस्ट २०२३ नंतरची ही सर्वात मोठी वीजटंचाई आहे. राजस्तान, गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ आणि दिल्ली या राज्यांमध्ये विजेची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे  या राज्यांनी केंद्र सरकारकडे  विजेची मागणी केली आहे. 
 
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जलविद्युतनिर्मितीत घट होऊन वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. दुसरीकडे, कोळशापासून होणार्‍या वीजनिर्मितीत वाढ झाली. सप्टेंबरमध्ये कोळशावर आधारित वीजनिर्मिती १३.३ टक्क्यांनी वाढली; मात्र कोळश्याचा मर्यादित साठा आणि वीजप्रकल्पांमधील देखभाल-दुरुस्तीच्या कामांमुळे वाढती मागणी पूर्ण करणे कठीण झाले. ‘ग्रिड इंडिया’च्या आकडेवारीनुसार, देशातील सुमारे ४७ टक्के कोळश्यावर आधारित वीजप्रकल्पांमध्ये कोळश्याचा साठा अत्यंत कमी होता. यंदा हवामानातील बदलाचाही विजेच्या मागणीवर परिणाम झाला. सरासरीपेक्षा अधिक उष्ण हवामानामुळे कूलर आणि वातानुकूलन यंत्रांचा वापर वाढला. त्याचबरोबर शेतीसाठी सिंचनाची गरज असल्याने विजेची मागणी कायम राहिली. 
 
केंद्र सरकार वीजटंचाईचा सामना करणार्‍या राज्यांना जास्त वीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर देशांतर्गत कोळसा उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे. सौरऊर्जेपासून निर्माण झालेल्या विजेचा साठा करता यावा, यासाठी बॅटरी स्टोरेजची क्षमता वाढवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. या उपाययोजनांमुळे विजेची कमतरता कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. मात्र विजेची मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत कायम राहिल्यास काही राज्यांमध्ये नागरिकांना वीजकपातीचा सामना करावा लागू शकतो. 
 
रोजची थाळी महाग
 
गेल्या वर्षभरात स्वयंपाकाच्या ४२ पैकी ४१ वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. कांद्याच्या दरांमध्ये तर ११३ टक्क्यांची वाढ झाली. महाराष्ट्रातील दुष्काळामुळे कांदा अजून महागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. साखर २२ टक्क्यांनी तर सूर्यफुलाचे तेल १८ टक्क्यांनी महागले आहे. तांदूळ, गहू, डाळींच्या किंमतीतही वर्षभर सातत्याने वाढ होत आहे.सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर ५.५ टक्के इतका वाढण्यामागे अन्नपदार्थांच्या वाढत्या किंमती हे मुख्य कारण ठरले आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईवाढीचा दर ५.५ टक्क्यां(गेल्या दोन वर्षांमधील उच्चांक) पर्यंत पोहोचण्यामागे अन्नपदार्थांच्या वाढत्या किमती हे एक प्रमुख कारण आहे. या महिन्यासाठी  अन्नधान्य महागाईवाढीचा दर ७.७४ टक्के इतका नोंदवला गेला.  कडधान्यांमध्ये तूरडाळीच्या सरासरी किरकोळ किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. तिचा दर प्रति किलो सुमारे १२९ रुपयांवर पोहोचला. वर्षभरापूर्वी तो ११३ रुपये होता. 
 
किंमती स्थिर ठेवण्यासाठी सरकार लवकरच  राखीव साठ्यातून हरभरा बाजारात आणण्याचा विचार करू शकते. खाद्यतेलांमध्ये, सूर्यफूल तेलाच्या सरासरी किरकोळ किंमतीत सर्वाधिक वाढ होऊन त्याची किंमत प्रति लिटर १९१ रुपयांवर पोहोचली. वर्षभराच्या तुलनेत ही सुमारे १८ टक्क्यांची वाढ आहे. त्यानंतर पाम तेल आणि सोया तेलाचा क्रमांक लागतो, त्यांच्या किंमतीत अनुक्रमे १५.२ टक्के आणि १४.६ टक्के वाढ झाली आहे. मोहरीच्या तेलाचे भावही एका वर्षापूर्वीच्या १८८ रुपये प्रति लिटरवरून २०४ रुपये प्रति लिटरपर्यंत वाढले आहेत. तांदळाची सरासरी किंमत सुमारे १२ टक्क्यांनी वाढून ४७ रुपये प्रति किलो झाली आहे, तर गहू आणि गव्हाच्या पिठाच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. साखरेचे भाव ५६ रुपये प्रति किलो दरापर्यंत खाली आले आहेत. एका महिन्यापूर्वी ते सुमारे ५९ रुपये होते, तरीही ते एका वर्षापूर्वीच्या तुलनेत सुमारे २२ टक्क्यांनी जास्त आहेत. उत्पादनातील अपेक्षेपेक्षा कमी घट हे या दरवाढीचे कारण मानले जात आहे. प्रमुख भाज्यांचा विचार करता,  कांद्याचे भाव ५३ रुपये प्रति किलोवर स्थिर आहेत, तर बटाट्याच्या दरात सहा टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. १२ ऑक्टोबरला टोमॅटो ४२ रुपये प्रति किलो दराने विकले जात होते. ते एका वर्षापूर्वी ३६ रुपये प्रति किलो होते. व्यापारीवर्गाच्या मते, कांद्याच्या दरातील या वाढीचे कारण म्हणजे देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन करणार्‍या महाराष्ट्रातील खरीप कांद्याच्या उत्पादनात झालेली अंदाजे पाच ते सात टक्क्यांची घट. लागवडीखालील क्षेत्रात झालेली घट आणि मॉन्सूनच्या पावसाला झालेला विलंब यामुळे ही घट झाली आहे. 
 
मद्यही महागणार?
 
सध्या रॉयल स्टॅग, ब्लेंडर्स प्राईड आणि मॅकडॉवेल्स यासारखे भारतातील लोकप्रिय मद्य ब्रँड बनवणार्‍या कंपन्या सरकारी तपासणीखाली आहेत. कर अधिकार्‍यांनी पर्नोड रिकार्ड आणि डियाजिओ या प्रमुख मद्य कंपन्यांनी केलेल्या आयातीची चौकशी सुरू केली आहे. कमी आयात शुल्क लागावे यासाठी या दोन कंपन्यांनी ब्रिटनमधून आयात केलेल्या काही स्कॉच व्हिस्की उत्पादनांचे चुकीचे वर्गीकरण केले असावे, असा संशय आहे. यामुळे आता मद्याच्या किंमती वाढणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. या तपासाच्या अनुषंगाने कंपन्यांच्या कार्यालयांची तपासणी करण्यात आली. फ्रेंच मद्य कंपनी पर्नोड रिकार्ड आणि ब्रिटनच्या डियाजिओची भारतीय शाखा असलेल्या ‘युनायटेड स्पिरिट्स’ची चौकशी सुरू आहे. 
 
कर अधिकार्‍यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीजवळील पर्नोड रिकार्डच्या भारतीय मुख्यालयाला भेट देऊन स्कॉचच्या आयातीबाबत अधिकार्‍यांची चौकशी केली. डियाजिओचे भारतीय युनिट असलेल्या ‘युनायटेड स्पिरिट्स’ने शेअर बाजारांत स्पष्ट केले, की अधिकार्‍यांनी त्यांच्या अनेक कार्यालयांमध्ये शोधमोहीम राबवली आहे. कंपनीने याला उद्योगव्यापी कारवाईचा भाग असल्याचे म्हटले आहे. ही चौकशी स्कॉच व्हिस्कीची आयात आणि वर्गीकरणाशी संबंधित आहे. रॉयल स्टॅग आणि मॅकडॉवेल्स या कंपन्याही चर्चेत आहेत. कारण त्या भारतात विकल्या जाणार्‍या मद्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात स्कॉच व्हिस्की कॉन्संट्रेट आयात करतात. त्यानंतर भारतात हे कॉन्संट्रेट इतर घटकांसोबत मिसळून वेगवेगळे ब्रँड तयार केले जातात. ‘युनायटेड स्पिरिट्स’च्या पोर्टफोलिओमध्येही मॅकडॉवेल्ससारखे ब्रँड आहेत. 
 
भारत आणि ब्रिटन यांच्यातील व्यापार करारानुसार १५ जुलैपासून विशिष्ट प्रकारच्या स्कॉच व्हिस्कीच्या आयातीवरील सीमा शुल्क १५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले; मात्र कर अधिकार्‍यांना संशय आहे, की मोठ्या प्रमाणात आयात केलेल्या ‘स्कॉच कॉन्सन्ट्रेट’ला कमी केलेल्या शुल्काचा लाभ लागू होत नाही. त्यांना उल्लंघनाचे पुरावे आढळले, तर कंपन्यांवर अतिरिक्त कर किंवा इतर कारवाई होऊ शकते. तपास सध्या सुरू असला तरी निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.

Related Articles