E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
रविवार केसरी
दिन दिन दिवाळी
Samruddhi Dhayagude
01 Nov 2026
येते मनात काही : प्रतिभा कणेकर
आज कराष्टमी, म्हणजे आली की दिवाळी उंबरठ्याशी. दारासमोर आकाशकंदिल टांगण्यासाठी मुलांची आणि अंगणात मोठमोठ्या रांगोळ्या काढायची मुलींची लगबग एकाच वेळी सुरु व्हायची! कराष्टमीपासून संध्याकाळी दरवाजाशी दोन पणत्या लावल्या जायच्या. जणू, दिवाळी एकेक पाऊल टाकत येतेय. तिच्या स्वागतासाठीची ही जय्यत तयारी.
कराष्टमीपासून आमच्या पालघरच्या आदिवासी, कुणबी, आगरी, वाडवळ या कृषिप्रधान समाजात ‘आठिंडे’ काढायची सुरुवात होते. त्यापूर्वी त्यांची भाताची कापणी-जोडणी यांची मोठीच धांदल असते. भाताच्या ‘पावोल्या’ बांधून, एकदा ‘उडवी’ रचली गेली की, खळे अन घर सारवायचे आणि सर्वात आधी राखेने घराभोवती एक रेघ मारायची. सारवलेल्या अंगणात राखेनेच सूर्य, चंद्र, तुळस आणि शेतीशी संबंधित अशी चित्रे काढायची. त्यात भाताची कणगी असते. कणगीवर चढायची शिडी अन शिडीवर चढणारा माणूस असतो. शिवाय सूप, टोपली, झाप, भात मोजायचे माप ही चित्रेही असतात. यालाच ‘आठोंडे’ म्हणतात
आदिवासी समाजात दिवाळीतल्या तीन रीती मुख्य! पहिली म्हणजे ‘देव खेळवणे’. एरवी त्यांचे देव एका बंद टोपलीत घालून माळ्यावर ठेवलेले असतात. दिवाळीपुरते ते नरकचतुर्दशीच्या दिवशी खाली उतरवतात. ‘शेंडीवाल्याला’ अर्थात, भगताला बोलावून देव खेळवतात. म्हणजे भगत पाटावर हे देव मांडतात. रात्रभर देवासमोर बसून गाणी म्हणतात. भगताच्या अंगात आले तर तो घरातल्यांना त्यांचे भविष्यही सांगतो. दुसर्या दिवशीची रीत असते ‘चवली खायाची’. या दिवशी काही कंदमुळे आणि चवळीचे कडधान्य उकडतात. घरातील ‘डोकरा-डोकरी’(आजोबा-आजी) घरातील सर्वांना चवळी ‘चारतात’ म्हणजे उकडलेल्या चवळीचा घास भरवतात. यानंतरच ते नवी चवळी खायला सुरुवात करतात. त्या रात्री गावातील ज्या शेतकर्याला पिठाचा बैल करण्याचा मान मिळालेला असतो, तो पिठाचा बैल घेऊन प्रत्येक घरी जातो. आयाबाया बैलाची पूजा करतात, शेतकरी त्यांना आशीर्वाद देतो.
बलिप्रतिपदेचा दिवस हा ‘ढोरे उडवण्याचा’ दिवस. बैलांना आंघोळ घालून सजवतात. त्यांच्या अंगावर गेरुचे हात उमटवतात, त्यांच्या गळ्यात मखमलीच्या म्हणजे झेंडूंच्या फुलांचे हार घालतात, त्यांच्या शिंगांना विशिष्ट झाडांच्या सालींचे गोंडे करून बांधतात. या दिवशी सगळ्यांच्या घरा-झोपड्यांतला कचरा उकिरड्यावर आणून ठेवतात व संध्याकाळी सगळे एकत्र जमून केरकचर्याच्या ढिगाला आग लावतात. त्या आगीवरून ढोरांना पळवतात. बैलांच्या झुंजी लावतात. रात्री मटण-मासे यांचे जेवण करायचे, दारू प्यायची आणि तारप्याच्या तालावर बायका-पुरुषांनी हातात हात घालून एकत्र नाचायचे. त्यालाच ‘पेरण’नाच किंवा ‘तारपा’ नृत्य म्हणतात.
कुणबी लोकांतही थोड्याफार अशाच रीती आहेत. हा समाज आदिवासींपेक्षा अधिक सधन. म्हणून ते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाटावर पैसे-दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. पालघर जिल्ह्यातील ‘किराट’ गावात दिवाळी साजरी करण्याची एक अनोखी पद्धत आहे. तिथल्या ‘पावडे’ आडनावाच्या आणि ज्यांचे कुलदैवत ‘बैरम’ आहे अशा ज्येष्ठ कुटुंबाकडे ‘काठी उभारण्याचा’ मान असतो. अशा एका कुटुंबात ‘वसोर्या’ म्हणजे शेणाने न सारवलेल्या टोपलीत घालून माळ्यावर देव व पूजेची काठी ठेवलेली असते. गावातल्या पावडे कुटुंबातील ज्या कुणाला काठी उभारायची आहे, त्या घरातील गृहिणी दोन भगतांना घेऊन ज्येष्ठ कुटुंबाकडे जाते. भगतांकरवी माळ्यावरून देव व काठी उतरवली जाते, तिची पाटावर पूजा, आरती होते अन वाजत-गाजत तिला घरी आणतात. तिथे पाटावर काठी ‘उभारून’ तिची साग्रसंगीत पूजा होते. त्यावेळी भगताच्या अंगात वेगवेगळ्या देवांचे वारे संचारते; अशी त्यांची श्रद्धा असते. रात्रभर तारप्याच्या सुरावर भगत या विविध देवांची वारी घेऊन नाचत असतात. गावातले अनेक लोक काठीपुढे नवस बोलतात. नवसाची तळी भरतात, काठीला नारळ वाहतात, कोंबडे सोडतात. दुसर्या दिवशी सोडलेले कोंबडे मारून, शिजवून त्याचा व नारळ फोडून त्याचा प्रसाद घरोघरी वाटतात. मूळ घरी काठी घेऊन जातात व मग भगताला एकशे एक रुपये देऊन त्याची बोळवण करतात.
आगरी समाजाची दिवाळी तीन दिवसांची असते. ‘बारकी कोड्या’, ‘मोठी कोड्या’ व ‘ढोरे उडवणे.’ या समाजात चिरेट्याच्या फळांच्या आणि निवडुंगांच्या खोडाच्या पणत्या तयार करतात. त्यांना ‘कोड्या’ म्हणतात. ‘बारकी कोड्यांच्या’ दिवशी दारात पाच पणत्या लावतात. दुसरा दिवस ‘मोठी कोड्यांचा.’ हा दिवाळीचा मुख्य दिवस. संध्याकाळी घराच्या मागील-पुढील दारात, चुलीजवळ, ओसरीत, कणगीत, गुरांच्या ‘शेणकई’त, गोठ्यात, माळ्यावर, साप-विंचवांसाठी शेतात अशा सगळीकडे ‘कोड्या’ लावतात. सगळं गाव मिणमिणत्या कोड्यांत उजळून निघतं. गोडाच्या करंज्या आणि तिखटाचं मटण करून दिवाळी साजरी करतात. तिसरा दिवस ढोरे उडवण्याचा. या दिवशी प्रत्येक घरातील केरकचरा घराची गृहिणी, एका टोपलीत घालून, तीवर एक पणती व एखादा रुपया ठेवून ती गावाने ठरवलेल्या जागी ठेवते. सगळ्या गावाच्या टोपल्या जमल्या की, शेतकरी तीवर पेंढा घालून ‘दिवाळी रचतात.’ त्यावर फटाके लावतात व सकाळच्या वेळी सजवलेल्या बैल-गुरांना झेंडूच्या फुलाच्या फांदीने हाकलत त्या आगीवरून पळवतात.
हा दिवस बळीचाही मानला जातो. दारासमोर पाटावर शेणाचे पाच गोळे ठेवायचे. त्यावर झेंडूची फुले वाहायची. घरातली शेतीची अवजारे गेरु लावून पाटावर ठेवून त्यांची पूजा करायची. पाटाच्या बाजूला नारळ ठेवायचा. खराट्याच्या काड्यांमध्ये झेंडूची फुले ओवून ती नारळाच्या शेंडीत खोचायची. निवडुंगाच्या फांदीत पाच दिवे लावायचे. नारळाचे पूजन करून तो नंतर बळी म्हणून जमिनीत गाडायचा. दुसर्या दिवशी, पाटावरचे शेणाचे गोळे आणि शेताच्या बांधावरच्या गवताच्या गुंड्या बांधून घराच्या छपरावर टाकतात. या वाळलेल्या गवताचा व शेणगोळ्यांचा उपयोग पुढच्या वर्षी शेतीचा राब भरायला करतात.
समुद्रकिनार्याकडे राहणारा वाडवळ समाज या सर्व समाजांपेक्षा सधन आहे. शिवाय औपचारिक शिक्षणाकडे इतर समाजाच्या आधी वळलेला आहे. या समाजातील अनेक स्त्रिया शाळेत शिक्षिका आहेत. त्यांच्याकडेही आथोंडे काढायची पद्धत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी घराच्या वळचणीला एरंडाची पाने लावायची, संध्याकाळी निवडुंगाच्या पणत्यांत दिवे लावायचे. त्याला ते ‘ठेव्या’तल्या दिवट्या म्हणतात. घरातील दागिने-पैसे यांची पूजा करतात. त्यावेळी मुले थाळ्या वाजवून दिवाळीचे स्वागत करतात. दुसरा दिवस ‘अंगमादोणी’चा. म्हणजे या दिवशी उटणे, नारळाचे दूध अंग, माथा यांना लावून अंगमाथा धोवणी! पायाखाली चिरोटे हे फळ फोडून नरकासुराचा वध करायचा. संध्याकाळी अंगणात दिवट्यांची पूजा करायची. घरात लक्ष्मीची पूजा करायची. बलिप्रतिपदेच्या आदल्या रात्री दारोदार गोवारी येतो. दर्भाचा दाब पेटवून दारावरून ओवाळत ‘येर्या येर्या गाय गोवार्या/ गायचा गोठा भरून जाव दे’म्हणून शुभचिंतन करतो. या समाजात दिवाळीचा लाडू-करंज्यांचा फराळ करायची पद्धत आहे. गोवार्याला फराळ व पैसे द्यायची रीत आहे.
दुसर्या दिवशी बैल सजवतात, त्यांची शिंग़े गेरूने रंगवतात, त्यांच्या अंगावर गेरूचे छाप उमटवतात. घरातल्या गृहिणीने केर रस्त्यावर ठेवून त्यावर जुना झाडू, दिवा ठेवून फटाका लावायचा अन मग घरात येऊन आंघोळ करायची. त्यानंतर ‘बळी काढणे’ ही रीत असते. एका तांब्यात आंब्याची पाने लावून, त्यावर नारळ ठेवून कलशाचा पाट अंगणात ठेवतात. कलशावरच्या नारळाला पाच पाच झेंडूची फुले लावलेल्या पाच काड्या खोचतात. कलशावर ऊन येऊ लागले की, तो घरात घेतात. त्यावर लावलेल्या काड्या घरातल्या प्रत्येक उंबरठ्याच्या वर पुढच्या दिवाळीपर्यंत बांधून ठेवतात.
पालघरच्या कृषिसमाजातल्या दिवाळीच्या या पद्धती मी अनुभवल्या त्यालाही आता पंधरा-वीस वर्षे होऊन गेली. म्हणून मग त्या त्या समाजातल्या माझ्या मुलांशी मुद्दाम बोलावं, असं ठरवलं. जुनं सगळंच सुटलेलं नाहीये पण आता मुलांना या रीतींमध्ये मज्जा उरली नाही. मुंबईच्या लोकांसारखे नवे कपडे विकत घ्यायचे, दुकानांतून लाडू-करंज्या, चिवडा-चकल्या आणून खायच्या, फटाके उडवायचे म्हणजे दिवाळी झाली आहे. आणि आता लहान शेताचे तुकडे लोकांनी बिल्डरांना विकलेत. गुरं उरली नाहीत. सविता म्हणाली. सविताचं गाव दूर डोंगरपायथ्याचे. तीच असं म्हणाल्यावर मग बाकी कुणाला फोन केलाच नाही. मनातल्या मनात गुणगुणत राहिले, ‘दिन दिन दिवाळी...गायी म्हशी ओवाळी’..
Related
Articles
काँग्रेसच्या देणग्या ७५ टक्क्यांनी घटल्या
09 Nov 2026
भूसंपादनासाठी महापालिका उचलणार 450 कोटींचे कर्ज
03 Nov 2026
जगभरातील बाजारात घसरण; सेन्सेक्सची उसळी कायम
07 Nov 2026
प्रवाशाच्या बेजबाबदार कृत्याने विमानातील प्रवाशांचा जीव धोक्यात
04 Nov 2026
गोकुळातली दिवाळी
08 Nov 2026
राजस्तानमध्ये नागौर फटाका गोदामात भीषण स्फोट ; दोघांचा मृत्यू
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित