वाह्यात व उपद्व्यापी!   

चर्चेतील चेहरे : राहुल गोखले 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नैतिकतेशी सुतराम संबंध नाही. मनमानीपणा आणि लहरीपणा हा त्यांचा खाक्या. त्यामुळेच उच्चपदांवर त्यांनी केलेल्या नियुक्त्या वादग्रस्त ठरल्या आहेत व ठरत आहेत आणि ट्रम्प तोंडघशी पडत आहेतच; पण मुख्य म्हणजे अमेरिकेची नामुष्की होत आहे. याच वादग्रस्त नियुक्त्यांमध्ये आता किंबरली गिल्फॉइल यांची भर पडली आहे. गेले दीड वर्ष त्या अमेरिकेच्या ग्रीसमधील राजदूत होत्या. मात्र आता त्यांची मानहानीकारक गच्छंती झाली आहे. याचे कारण राजदूताच्या पदाला न शोभणारे त्यांचे वर्तन. अर्थात, त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही; कारण आजवर त्यांनी जेथे जेथे काम केले तेथे तेथे त्या वादग्रस्तच ठरल्या होत्या; एवढेच नव्हे तर त्यांच्यावर गंभीर आरोप होते. असे असताना ट्रम्प यांनी डिसेंबर २०२४ मध्ये गिल्फॉइल यांची ग्रीसच्या राजदूतपदी नेमणूक घोषित करण्यात कोणतेही हशील नव्हते; पण धक्कातंत्राच्या मोहात अडकणार्‍यांना तारतम्याची जाणीव क्वचितच असते. तथापि, आता गिल्फॉइल यांचा वाह्यातपणा ट्रम्प यांच्याही गळ्यातले लोढणे बनला आणि आपणच नियुक्त केलेल्या राजदूताला राजीनामा देण्याचे आदेश देण्यावाचून ट्रम्प यांच्याकडे पर्याय राहिला नाही.
 
९ मार्च १९६९ रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे जन्मलेल्या गिल्फॉइल यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून व नंतर सॅन फ्रान्सिस्को विद्यापीठातून शिक्षण घेतले. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या गिल्फॉइल यांनी १९९४ मध्ये सॅन फ्रान्सिस्को जिल्हा न्यायालयात वकिली सुरू केली. मात्र, प्रथमपासून त्यांचा कल श्रीमंतांशी संबंध प्रस्थापित करणे आणि चैनीचे जीवन जगण्याकडे होता. प्रसिद्ध तेल व्यावसायिक आणि अमेरिकेतील अब्जाधीश गॉर्डन गेटी हे प्रथम रिपब्लिकन पक्षाचे समर्थक होते आणि त्या पक्षासाठी निधी संकलन करायचे; नंतर त्यांचा राजकीय कल डेमोक्रॅटिक पक्षाकडे वळला. अर्थात, तो भाग अलहिदा, कारण राजकीय विचारधारेपेक्षा गिल्फॉइल यांना स्वारस्य होते ते अशा प्रभावशाली कुटुंबांशी संबंध जुळवण्यामध्ये. अशाच एका निधी संकलनाच्या निमित्ताने त्यांची गाठ गॉर्डन यांचे पुत्र बिली गेटी यांच्याशी पडली आणि त्यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. गेटी यांच्यामार्फतच गिल्फॉइल यांची भेट गॅविन न्यूसम यांच्याशी झाली. न्यूसम व गेटी यांचा कौटुंबिक स्नेह होता आणि गॅविन न्यूसम यांना त्यांच्या व्यवसायाच्या उभारणीत गेटी यांनी आर्थिक मदत केली होती. न्यूसम यांच्याशी भेट झाल्यावर गिल्फॉइल यांचे त्यांच्याशी प्रेमप्रकरण सुरू झाले.
 
सॅन फ्रान्सिस्को येथे जिल्हा न्यायाधीशपदी नेमणूक झालेल्या अधिकार्‍याने शहरात चौदा वकिलांची १९९६ मध्ये हकालपट्टी केली, त्यात गिल्फॉइल यांचाही समावेश होता. तेव्हा काही काळ त्यांनी लॉस एंजेलिसमध्ये वकिली केली. मात्र त्यानंतर चार वर्षांनी त्या सॅन फ्रान्सिस्कोला परतल्या. त्याच वेळी कमला हॅरिस तेथे वकिली करीत होत्या; त्यांच्याशी गिल्फॉइल यांचा परिचय झाला, पण त्यांनी एकत्र काम केले नाही. दरम्यान, न्यूसम यांच्याशी गिल्फॉइल यांनी २००१ मध्ये विवाह केला. न्यूसम हे व्यावसायिक होते, पण राजकारणातही सक्रिय होते. २००३ मध्ये ते सॅन फ्रान्सिस्कोच्या महापौरपदी निवडून आले आणि शहराच्या ’फर्स्ट लेडी’ म्हणून मिरवण्याचा मान गिल्फॉइल यांना मिळाला. न्यूसम पुन्हा २००७ मध्ये महापौर झाले, पण तोवर न्यूसम व गिल्फॉइल यांचा घटस्फोट झाला होता. २००५ मध्ये म्हणजे विवाहानंतर चार वर्षांतच ते विभक्त झाले. त्यानंतर अवघ्या वर्षभरातच गिल्फॉइल या फॉक्स न्यूज या वृत्तवाहिनीवर रुजू झाल्या. काही कार्यक्रमांच्या सूत्रसंचालक म्हणून त्या काम करू लागल्या आणि त्यांना लोकप्रियताही मिळाली. तथापि, तेथेही त्यांचे वर्तन आक्षेपार्हच होते व वाह्यातपणात कुठेही कमी नव्हती. फॉक्स न्यूजच्या एका माजी सहाय्यकाने दाखल केलेल्या ४२ पानांच्या गुप्त तक्रारीनंतर, वृत्तवाहिनीच्या अधिकार्‍यांनी अंतर्गत चौकशी सुरू केली. ती चौकशी वर्षभर चालली. गिल्फॉइल या कामाच्या ठिकाणी गैरवर्तवणूक करतात; सहकार्‍यांना अत्यंत अश्लील व आक्षेपार्ह छायाचित्रे दाखवतात; एवढेच काय सहाकार्‍यांकडून अयोग्य अशा लैंगिक मागण्या करतात असा त्या आरोपांत समावेश होता. अखेरीस चौकशीअंती गिल्फॉइल यांना तेथून राजीनामा द्यावा लागला. मात्र, प्रभावशाली व्यक्तींशी जवळीक साधण्याची त्यांची खोड काही जिरली नव्हती.
 
डोनाल्ड ट्रम्प हे २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीत पुन्हा निवडून येण्याच्या तयारीला लागले होते. गिल्फॉइल ट्रम्प यांच्या प्रचारात सामील झाल्या खर्‍या, पण त्यांचे खरे लक्ष्य  वेगळेच होते. त्यांनी २०१८ मध्येच ट्रम्प यांचे सुपुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांना आपल्या जाळ्यात ओढले होते आणि त्यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले होते. त्यामुळे त्या ट्रम्प यांच्या प्रचारात सामील झाल्या यात नवल काही नव्हते. २०२० च्या निवडणुकीत ट्रम्प पराभूत झाले आणि २०२१ च्या जानेवारी महिन्यात त्यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल हिलवर धुडगूस घातला. या घटनेच्या गिल्फॉइल साक्षीदार तर होत्याच, पण हा धुडगूस ’पद्धतशीरपणे’ घडावा यात त्यांचा सहभागही होता. परिणामी, त्यांना अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या चौकशी समितीला सामोरे जावे लागले. अर्थात त्यांना त्यात शिक्षा झाली नाही.
 
२०२४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांच्यात गिल्फॉइल यांना असणारा रस संपला. पण ऐन निवडणुकीच्या धामधुमीत याचा बभ्रा होऊ नये म्हणून ही बाब लपवून  ठेवण्यात आली. तथापि, निवडणूक पार पडल्यानंतर ट्रम्पपुत्राचे दुसर्‍या एका महिलेसोबत एक छायाचित्र प्रकाशात आले आणि गिल्फॉइल-ट्रम्पपुत्र प्रेमप्रकरण संपुष्टात आल्याचे उघड झाले. तरीही, ट्रम्प यांनी कदाचित गिल्फॉइल यांच्या निष्ठेचा ’मोबदला’ म्हणून असेल; त्यांना ग्रीसच्या राजदूतपदाचे ’बक्षीस’ दिले. विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी तोवर औपचारिकपणे अध्यक्षपदाची धुराही स्वीकारली नव्हती, पण त्याआधीच त्यांनी ही नियुक्ती जाहीर केली होती. गिल्फॉइल यांच्या कोणत्या कौशल्याकडे पाहून ट्रम्प यांनी त्यांना हे पद दिले, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक! मात्र, ग्रीसमध्ये अमेरिकेच्या राजदूत म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर गेल्या दीडेक वर्षांत त्या कोणत्याही उल्लेखनीय कामासाठी चर्चेत आलेल्या नाहीत; त्या प्रसिद्धीझोतात आल्या आहेत त्या केवळ नवनवीन वादंगांमुळेच!
 
गिल्फॉइल यांचे एकेक प्रताप ऐकून त्यांची स्वतःची इभ्रत जास्त धुळीस मिळाली की त्यांना नेमणार्‍या ट्रम्प यांची, हाच काय तो दुमताचा मुद्दा ठरू शकतो. ग्रीसमधील एका बांधकाम उद्योगाची त्यांनी उघडपणे तरफदारी केली आणि बल्गेरियापासून अल्बेनियापर्यंतच्या सरकारांना त्या उद्योगाशी ’सहकार्य’ करण्याची ’सूचना’ केली. विशेष म्हणजे, त्याच कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या खासगी विमानाने गिल्फॉइल यांनी २०२६ मधील जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीसाठी प्रवास केला. ग्रीसमध्ये एका औपचारिक भोजन सोहळ्यात त्यांनी, ’अमेरिका कोणत्याही देशातील राजकीय बदलांमध्ये हस्तक्षेप करू शकते,’ अशी पदाला अजिबात न शोभणारी दर्पोक्ती केली. ज्या समारंभात त्यांनी हे वक्तव्य केले तेथे ग्रीसचे ऊर्जामंत्रीही उपस्थित होते; पण असली बेजबाबदार विधाने करण्यात गिल्फॉइल यांना संकोच वाटला नाही. त्यांनी केलेल्या काही चैनीच्या प्रवासांचे पुरस्कर्ते काही उद्योगव्यवसाय होते; हे त्यांचे बिंग फुटले आणि एवढे होऊनही ट्रम्प मात्र गिल्फॉइल ग्रीसच्या राजदूत म्हणून उत्तम कामगिरी करत असल्याची प्रशस्ती करण्यात धन्यता मानत होते.
 
मात्र, अलीकडेच ’वॉल स्ट्रीट जर्नल’ने आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला, तो म्हणजे अगदी राजदूतपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वीच गिल्फॉइल यांनी एरिक डेटर्स यांना आपल्या क्रेडिट कार्डवरील सुमारे एक लाख डॉलर (सुमारे ८०-९० लाख रुपये) इतका खर्च अदा करण्याची सूचना केली होती. डेटर्स हे ट्रम्प यांचे समर्थक आणि देणगीदार असल्याने हे सगळे लागेबांध्यांसाठी होते हे उघडच होते. अर्थात, त्यावेळी डेटर्स यांनी गिल्फॉइल यांच्या क्रेडिट कार्डचे पैसे भरले नाहीत हे खरे, पण गौप्यस्फोटानंतर गिल्फॉइल यांनी असा कोणताही संवाद झाल्याचेच नाकारले. त्यामुळे नाराज झालेले डेटर्स यांनी गिल्फॉइल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. डेटर्स यांनी गिल्फॉइल यांची तुलना फसवणूक, लबाडी व कपट यांचे प्रतीक असणार्‍या ’अपॅटे’ या ग्रीक देवीशी केली आहे, त्यात सगळे आले! बहुधा आता प्रकरण हाताबाहेर जात असल्याची जाणीव एरवी नैतिकतेशी फारसा संबंध नसलेल्या ट्रम्प यांनाही झाली असावी, आणि अखेर गिल्फॉइल यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले.
 
यातील विरोधाभास असा की, हे आदेश देण्यात आल्याची माहिती माध्यमांना देणार्‍या व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव केटी झकारिया या स्वतःची खोटी माहिती दिल्याचा आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात सापडल्या आणि अवघ्या पाच दिवसांत त्यांनाच पदावरून पायउतार होण्याची नामुष्की ओढवली. ट्रम्प यांनी नेमलेले अनेक जण असेच वादग्रस्त आणि खुशालचेंडू आहेत पण गिल्फॉइल या केवळ वादग्रस्त नव्हत्या, तर त्या वाह्यात व उपद्व्यापी होत्या व आहेत. त्या जेथे गेल्या तेथे त्यांनी योगदानापेक्षा ओंगळपणाच जास्त केला. त्यांना ग्रीसच्या राजदूतपदी नेमून ट्रम्प यांनी घोडचूक केली होती. अखेरीस ती सुधारण्यावाचून पर्यायच राहिला नव्हता. आता राजदूतपद गमावलेल्या किंबरली गिल्फॉइल पुढे कोणते नवीन ‘प्रताप’ करणार, एवढाच काय तो औत्सुक्याचा मुद्दा आहे!

Related Articles