‘राजद’चे अनिल झा विजयी   

बिहार विधान परिषद निवडणूक

पाटणा : बिहार विधान परिषद निवडणुकीत दरभंगा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) उमेदवार अनिल झा यांना निवडणूक आयोगाने शुक्रवारी अधिकृतपणे विजयी घोषित केले.
 
या मतदारसंघातील मतमोजणी प्रदीर्घ काळ चालल्यामुळे विरोधी पक्ष राजदने आक्षेप नोंदवला होता.निवडणूक आयोगाच्या निवेदनानुसार, अनिल झा यांना २५,४०६ मते मिळाली. त्यांनी भाजपचे विद्यमान विधान परिषद सदस्य सर्वेश कुमार यांचा ४,०१० मतांनी पराभव केला. कुमार यांना २१,३९६ मते पडली. 
 
बिहारमधील साठ जागांसह उत्तर प्रदेश (११), कर्नाटक (४) आणि महाराष्ट्रातील (५) एकूण २८ जागांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले होते. बिहारमध्ये राजदने दोन जागा जिंकल्या असून, यामुळे सभागृहातील सदस्य संख्या १७ वर पोहोचली आहे. विधानसभा निवडणुकीत राजदला दारुण पराभवास सामोरे जावे लागले होते. त्यानंतरही, शिक्षक आणि पदवीधरच्या दोन जागा पटकावण्यात राजदला यश मिळाले आहे.  पाटणा शिक्षक मतदारसंघात राजद उमेदवार संजीव कुमार यांनी भाजपचे पाच वेळा विधान परिषद सदस्य राहिलेले नवल किशोर यादव यांचा पराभव केला.
 
विधान परिषदेच्या २८ जागांसाठी मंगळवारी ज्या-त्या राज्यात मतमोजणीस सुरुवात झाली होती. गुरुवारीही मतमोजणी सुरू राहिल्याने राजदचे कार्याध्यक्ष आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 
 

Related Articles