उत्तर प्रदेशात सरकार आल्यास समान नागरी कायदा : शहा   

लखनौ : उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी झाला आणि पुुन्हा सत्तेवर आल्यास राज्यात समान नागरी कायदा लागू केला जाईल, असे गृहमंत्री अमित शहा यांनी पक्ष कार्यकारिणी बैठकीत शुक्रवारी सांगितले.
 
डॉ. राम मनोहर लोहिया राष्ट्रीय कायदा विद्यापीठाच्या सभागृहात दिवसभर पक्ष कार्यकर्त्यांसोबत शहा यांनी बैठक घेतली. बैठकीचे अध्यक्षपद प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी यांनी भूषविले.या प्रसंगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उप मुख्यमंत्री केशव मौर्य आणि ब्रिजेश पाठक, राज्य प्रभारी विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस स्मृती इराणी यांच्यासह अन्य जण उपस्थित होते. 
 
राम मंदिराचा मुद्दा आणि मतदार यादीतील अनियमिततेच्या विषयावरून टीका करणार्‍या समाजवादीसह विरोधी पक्षांंना शहा यांनी धारेवर धरले. अन्य राज्यात ज्या प्रमाणे समान नागरी कायदा लागू केला आहे त्याप्रमाणेच तो उत्तर प्रदेशात लागू केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील भाजपचे सरकार अंगदाच्या पायाप्रमाणे भक्कम पाय रोवून उभे आहे. पुन्हा भाजपची सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी प्रकट केला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना आणखी ३० वर्षे सत्ता स्थापन करण्यासठी वाट पाहावी लागेल, अशी टीकाही त्यांनी केली. त्यांच्या तिसर्‍या पिढीला नागरिक कधीच माफ करणार नाहीत, असेही ते म्हणाले. ३० ऑक्टोबर १९९० मध्ये समाजवादी पक्षाच्या नेतृत्वा खालील सरकारने राम मंदिराच्या विषयावरून कारसेवकांवर गोळ्या झाडल्या होत्या, याची आठवण त्यांनी या वेळी करून दिली. 
 

Related Articles