‘एसआयआर’ला मुदतवाढ   

मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी आणखी एक संधी

मुंबई, (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील मतदार यादी विशेष तीव्र पडताळणी (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता नागरिकांना १३ नोव्हेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. 
 
या निर्णयामुळे पात्र नागरिकांना मतदार यादीतील नाव समाविष्ट करून घेण्यासह नोंदींमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावरील पोस्टद्वारे या मुदतवाढीची माहिती दिली असून, राज्यातील नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव आणि वैयक्तिक तपशील काळजीपूर्वक तपासावेत, असे आवाहन केले आहे.
 
निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, दावे आणि हरकती दाखल करण्याचा कालावधी आता १३ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. दावे आणि हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया २५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी नवीन नोंदणीसाठी अर्ज करावा. तसेच, विद्यमान नोंदींमध्ये नाव, पत्ता किंवा अन्य तपशिलांमध्ये त्रुटी असल्यास दुरुस्तीसाठी अर्ज करावा. याशिवाय, आवश्यकतेनुसार मतदार यादीतील नोंदींबाबत हरकतीही दाखल करता येणार आहेत. ही प्रक्रिया १३ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी सहभाग महत्त्वाचा

प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे आणि मतदार यादी अचूक व अद्ययावत राहणे हे लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या या अतिरिक्त संधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा. अचूक मतदार यादी ही सशक्त लोकशाहीचा पाया असून, या प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे  फडणवीस यांनी म्हटले आहे.
 

Related Articles