५० किलो वजनाच्या नियमाला दोन महिन्यांची मुदतवाढ द्या   

श्री शारदा गजानन आडते असोसिएशनची मागणी 

पुणे : शेतमालाच्या गोण्यांचे वजन ५० किलोपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीस १ जानेवारी २०२७ पर्यंत दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, तसेच महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये या नियमाची एकसमान अंमलबजावणी करावी, अशी मागणी श्री शारदा गजानन आडते असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
 
या संदर्भात असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष  नांगरे, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेचे सचिव दिनेशसिंग चंदेल आणि बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप यांच्याशी चर्चा करून आपली भूमिका मांडली आहे. 
 
जड वजनाच्या गोण्या सतत उचलल्यामुळे कामगारांच्या कंबर, पाठीचा कणा, खांदे व गुडघ्यांवर ताण येऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने ५० किलो वजनाची मर्यादा योग्य असून, तिच्या अंमलबजावणीस असोसिएशनचा विरोध नाही. मात्र, शेतकरी व व्यापार्‍यांना नवीन पॅकिंग पद्धतीचा अवलंब करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ आवश्यक आहे.
 
असोसिएशनच्या संचालक मंडळाने अनेक शेतकरी बांधवांशी तसेच शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांच्याशी चर्चा केली. पाटील यांनी पणनमंत्री जयकुमार रावल आणि राष्ट्रीय बाजार समित्यांचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर व बाजार समितीचे सचिव दिनेशसिंग चंदेल यांच्याशी संपर्क साधून मुदतवाढ देण्याची विनंती केली. पुणे बाजार समितीतच नियमाची कडक अंमलबजावणी झाल्यास शेतमालाची आवक इतर बाजारपेठांकडे वळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये समान नियम लागू करणे आवश्यक आहे.या चर्चेत असोसिएशनचे अध्यक्ष अमोल घुले, सचिव राहुल कोंढरे, खजिनदार दिलीप भालेराव तसेच संचालक निखिल भुजबळ, जीतु महाजन, पराग म्हैत्रे, संजय भोंडवे, अजित घुले, आबासाहेब ढमाले, नंदकुमार गावडे, गिरीश शेंडकर, भरत गिरे सहभागी होते.

आडत्यांकडूनही शेतकर्‍यांमध्ये जागृती 

मुदतवाढीच्या कालावधीत शेतकर्‍यांमध्ये ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या न भरण्याबाबत जनजागृती करण्यात येईल. कामगारांचे आरोग्य, शेतकर्‍यांचे हित आणि पुणे बाजार समितीतील शेतमालाची आवक यांचा समतोल राखण्यासाठी मुदतवाढ द्यावी व राज्यभर नियमाची एकसमान अंमलबजावणी करावी. 
 
- अमोल घुले, अध्यक्ष, श्री शारदा गजानन आडते असोसिएशन, मार्केटयार्ड. 
 

Related Articles